---Advertisement---
जळगाव : शहरातील मेहरूण शिवारातील संत सेना महाराज उद्यानात सुरू असलेल्या अनधिकृत शेड बांधकामाची तात्काळ चौकशीसह कायदेशीर कार्यवाही संदर्भात महानगरपालिकेस आत्तापर्यंत स्मरणपत्रे दिली आहेत. मात्र, त्याची दखल घेतली नसल्याची व्यथा माजी नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे यांनी मांडली आहे.
मेहरूण शिवार गट क्रमांक ४४४ मधील आदर्शनगर, उज्ज्वल स्कूल शेजारी संत सेना महाराज उद्यानात सध्या एक अनधिकृत शेडचे बांधकाम सुरू आहे. बांधकामासाठी मनपाची कोणतीही अधिकृत परवानगी घेण्यात आलेली नाही. हे उद्यान मनपा निधीतून तयार केले आहे. त्यासाठी १० लाख खर्च करून कंपाउंड वॉल व झोके बसविण्यात आले आहे. हे उद्यान परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांसह महिलांसाठी विश्रांती व मनोरंजनाचे महत्त्वाचे ठिकाण आहे. परंतु सद्यस्थितीत सुरू असलेल्या अनधिकृत शेड बांधकामामुळे उद्यानाचा मूळ उद्देश बाधित होत आहे.
तसेच परिसरातील नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. हा खुला भूखंड २० हजार स्क्वेअर फूट आहे. त्याचे सध्याच्या बाजारभावानुसार मूल्य अंदाजे १४ कोटी आहे. यापूर्वी, तीन वेळा तक्रार करूनही प्रशासनाकडून ठोस कार्यवाही न झाल्यामुळे असे दिसून येते की, मनपा प्रशासन अतिक्रमणास पाठबळ देत असल्याची भावना निर्माण झाली आहे.
अनधिकृत शेडचे बांधकाम थांबविण्यात यावे. संबंधितावर अतिक्रमणविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा. उद्यानाची जागा नागरिकांसाठी खुली ठेवण्यात यावी. याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणीही पृथ्वीराज सोनवणे यांनी केली आहे. संत सेना महाराज उद्यान नाभिक समाजाचे श्रद्धास्थान आहे. गेल्या २०१८ मध्ये मनपा महासभेच्या ठरावाद्वारे हे नाव देण्यात आले आहे. नाभिक समाजबांधव या जागेच्या सौंदर्याकरणासह संवर्धनासाठी प्रयत्नशील असल्याचेही निवेदनात नमूद केले आहे.