---Advertisement---

Pune Crime : विवाह जुळवणाऱ्या संकेतस्थळावर ओळख, एकमेकांची पसंतीही झाली, पण… तरूणीसोबत भयंकर प्रकार

---Advertisement---

पुणे : विवाह जुळवणाऱ्या संकेतस्थळावर संपर्क साधून एका संगणक अभियंता तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून ३५ लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या आरोपीला बाणेर पोलिसांनी मुंबईतून अटक केली आहे. साईश जाधव (२५) असे आरोपीचे नाव आहे.

तक्रारदार तरुणी बालेवाडी हायस्ट्रीट येथील एक आयटी कंपनीत नोकरी करत असून, ती बाणेर परिसरातील एका होस्टेलमध्ये वास्तव्य आहे. तिने विवाह जुळवणाऱ्या संकेतस्थळावर नोंदणी केली होती.

दरम्यान, आरोपीने त्या संकेतस्थळावरून तिला संपर्क साधला आणि लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर तो बाणेर परिसरात भेटण्यासाठी आला आणि रेस्टॉरंटमध्ये दोघांनी जेवण केले. तिथेच पसंती कळवली आणि बोलण्याची सुरूवात झाली.

आरोपीने आपल्या कुटुंबाची माहिती दिली, “आई-वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले असून, भाऊ दुबईत नोकरी करतो,” अशी बतावणी केली. तक्रारदार तरुणीने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि दोघांचा संवाद सुरू झाला. त्याचा फायदा घेत आरोपीने तिला आर्थिक संकटात असल्याची बतावणी करून पैसे मागितले. “एका मित्राने माझी आर्थिक फसवणूक केली असून, पैसे न भरल्यास मला कारागृहात जावे लागेल,” असे त्याने सांगितले. त्यानंतर त्याने महागडा मोबाईलदेखील घेतला.

आरोपीच्या मागण्यावर विश्वास ठेवून, तरुणीने कर्ज घेऊन त्याला पैसे दिले. कंपनी व खासगी वित्तपुरवठा कंपनीकडून कर्ज घेत, दीड ते पावणेदोन वर्षांत आरोपीने ३५ लाख २५ हजार रुपये उकळले.

दरम्यान, आरोपीला विवाहाबाबत विचारणा केली असता, तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. यामुळे तरुणीला त्याच्या उद्देशावर शंका आल्याने बाणेर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. आरोपीला बाणेर पोलिसांनी मुंबईतून अटक केली असून, पुढील तपास सहायक निरीक्षक अनिल केकाण करत आहेत.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment