अभियांत्रिकीची नवी दुकाने…?

वेध

– अनिरुद्ध पांडे

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) नुकताच एक निर्णय घेऊन भारतात नवीन अभियांत्रिकी महाविद्यालये सुरू करण्यावरील बंदी मागे घेतली आहे. गेल्या सुमारे 10 वर्षांपासून अभियांत्रिकी शिक्षण घेऊन ‘इंजिनीअर’ झालेल्या विद्यार्थ्यांची त्यांच्या रोजगार संदर्भात दुर्दशाच आहे. या पृष्ठभूमीवर परिषदेचा हा निर्णयही धक्कादायकच आहे. 2014-15 मध्ये देशभरात अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे 32 लाख विद्यार्थी होते. त्यात हळूहळू घट होऊन 2021 मध्ये ही विद्यार्थी संख्या 23 लाख 28 हजारांवर घसरली. 2014-19 पासून आतापर्यंत 400 हून अधिक अभियांत्रिकी शिक्षण संस्था बंद पडल्या आहेत. त्यापैकी 63 संस्था 2021-22 या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. तशी एआयसीटीई नेमकी स्थिती अभ्यासून विद्यार्थ्यांच्या जागा कमी-जास्त, गेल्या 10-12 वर्षांपासून तर केवळ कमीच करण्याचा निर्णय घेत असते. 2015-16 मध्ये अशाच लाखभर जागा कमी करण्यात आल्या होत्या. 2021-22 मध्ये 1 लाख 46 हजार जागा पुन्हा कमी करण्यात आल्या. 2015 ते 2021 या कालावधीत 400 हून अधिक अभियांत्रिकी शिक्षण संस्था बंद पडल्याची नोंद आहे. तरीही दुसरीकडे देशाच्या मागास भागात अभियांत्रिकी शिक्षण मिळावे म्हणून 2017 ते 2020 या कालावधीत काही नव्या संस्था उघडण्यास परवानगी देण्यात आली होतीच. पण अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) नवी अभियांत्रिकी महाविद्यालये सुरू करण्यास चार वर्षांपूर्वी बंदी घातली होती.

आता 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी एआयसीटीईने नवी अभियांत्रिकी महाविद्यालये सुरू करण्यावरील बंदी एप्रिल 2023 मध्ये मागे घेतली आहे. महाराष्ट्र राज्यापुरता विचार केल्यास 2019 ते 2023 या चार वर्षांत 5 लाखांहून अधिक प्रवेश क्षमता असताना सुमारे पावणेदोन लाख जागा रिक्तच राहिल्या आहेत. 2019-20 मध्ये 1,35,312 अभियांत्रिकी प्रवेश क्षमता असताना 59,989 जागा रिक्त होत्या. 2020-21 मध्ये प्रवेश क्षमता 1,34,806 असताना 55,078 जागा रिकाम्या होत्या. 2021-22 मध्ये 1,35,543 प्रवेश उपलब्ध असताना 31,809 जागा भरल्याच गेल्या नव्हत्या तर 2022-23 या शैक्षणिक वर्षात 1,37,123 अभियांत्रिकी प्रवेश क्षमता असताना 35,000 जागा रिकाम्या राहून गेल्या होत्या. गेल्या दोन वर्षांत, पूर्वीच्या दोन वर्षांच्या तुलनेत दरवर्षी 20 ते 25 जास्त विद्यार्थ्यांनी ‘इंजिनीअर’ होण्याचे ठरवले ही गोष्ट खरी आहे. पण याच दोन वर्षांत अधिकृतपणे उपलब्ध जागांपैकी 66 हजारांपेक्षा जास्त जागी प्रवेश घेतलेच गेले नव्हते, हीसुद्धा गोष्ट तितकीच खरी आहे. परंतु, दोन वर्षांत बारावीचा निकाल वाढल्यामुळे प्रवेश संख्या वाढली, हे नाकारता येत नाही. प्रवेश संख्या वाढल्यानंतरही त्याच दोन वर्षांत 30 आणि 35 हजार ही रिक्त सं‘या होती. याकडेही दुर्लक्ष करता येत नाही. या परिस्थितीत अखिलभारतीय तंत्रशिक्षण परिषदेने नवीन महाविद्यालये उघडण्यावरील बंदी उठवावी, हे निश्चितच अनाकलनीय आहे. इतकेच नव्हे तर हा निर्णय चुकीचाच ठरण्याची अधिक शक्यता आहे.

अभियांत्रिकी शिक्षणाची ‘दुकाने’ आता पूर्वीसारखी चालत नाहीत, हे तथाकथित शिक्षणसम‘ाटांना आता चांगलेच माहीत आहे. त्यामुळे कदाचित ही दुकाने फारशी उघडली जाण्याची शक्यता नाही. पण ज्या संस्थांना खरोखरच अभियंते घडवण्यात रस आहे, अशाच ‘खर्‍या’ शिक्षण संस्था नवीन महाविद्यालये उघडू शकतात. त्यामुळे दर्जेदार शिक्षणाच्या संधी अधिक मिळून कदाचित या क्षेत्राचे भलेही होऊ शकेल. अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्राकडे केवळ दुकानदारी म्हणून पाहणार्‍यांचे पितळ उघडे पडून अनेक संस्था बंद पडल्या. इमारत नाही, अध्यापक नाहीत, प्रयोगशाळा नाहीत अशा फालतू शिक्षण संस्था मध्यंतरी बंद पडून गेल्या आहेत. विद्यार्थ्यांची फसवणूक करणार्‍या अशा संस्था बंद पडणे हीअभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रातली ‘इष्टापत्ती’च आहे, असे त्यावेळी शिक्षणतज्ज्ञांनी म्हटले होते; त्यातही नाकारण्यासारखे काहीच नव्हते.

काही वर्षांपासून तर एखाद्या स्थापत्य अभियंत्याला गवंडी काम करणार्‍याच्या बरोबरीत पैसे मिळतात, अशी बोंब असायची. दर्जेदार महाविद्यालयांमधीलच विद्यार्थ्यांना बर्‍यापैकी काम मिळायचे. पुढेपुढे आयटी या चांगले पैसे देणार्‍या शाखेलाही अवकळा आली. आलतूफालतू महाविद्यालयांमधून इंजिनीअर झालेल्यांना कामही मिळेनासे झाले. या स्थितीची जाणीव झाल्यामुळे अभियंता करणारे शिक्षण घ्यायला मुले आणि पालकही टाळू लागले. चांगल्या महाविद्यालयातून झालेला इंजिनीअर आणि त्यानंतर त्याने केलेले ‘एमबीए’ यातूनच चांगले काम मिळते, असा अनुभव येऊ लागला. यातूनअभियांत्रिकीचे मिळवलेले ज्ञान बिनकामाचे होऊन आपले ‘प्रॉडक्ट’ खपवण्यात हे एमबीए अभियंते यशस्वी होऊ लागले. अशा परिस्थितीतूनच अनेक अभियंते बँकांच्या किंवा राज्य सेवा आयोगाच्या परीक्षा देऊन, तिकडेही लिपिक किंवा अधिकार्‍याच्या भूमिकेत दिसू लागले. अर्थातच त्यातही बहुतांश यशस्वीच ठरले. पण अभियांत्रिकी शिक्षण घेऊन आणि अभियंता म्हणूनच कर्तृत्व दाखविण्याची उत्तम संधी मिळेल तोच या क्षेत्रासाठी सुदिन म्हणावा लागेल.

– 9881717829