नागपूर : महाराष्ट्र विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचं (Winter Session Maharashtra) तात्पुरतं वेळापत्रक जाहीर झालं आहे. 7 डिसेंबर ते 20 डिसेंबरला नागपुरात हिवाळी अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं आहे. मात्र यंदाचं हिवाळी अधिवेशन अवघ्या 10 दिवसांत गुंडाळलं जाण्याची शक्यता आहे. हिवाळी अधिवेशनात नाशिक-पुण्यातील ड्रग्ज प्रकरण, राज्यातील दुष्काळी स्थिती, पाण्याचा प्रश्न, कायदा-सुव्यवस्था, नागपूरमध्ये अतिवृष्टीने झालेलं नुकसान हे मुद्दे गाजण्याची शक्यता आहे.
हिवाळी अधिवेशनाच्या 7 डिसेंबर ते 20 डिसेंबर दरम्यान दहा दिवसाच्या कामकाजाची तात्पुरती दिनदर्शिका जाहीर झाली आहे. म्हणजे 7 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनाचे कामकाज 20 डिसेंबरपर्यंतच नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे 20 तारखेलाच अधिवेशन गुंडाळलं जाणार का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
दरम्यान, हिवाळी अधिवेशन गुंडाळण्याच्या मुद्द्यावरुन काँग्रेस नेते नाना पटोले आक्रमक झाले आहेत. “देवेंद्र फडणवीस राज्याचे सरकार चालवत आहेत. विदर्भात हे अधिवेशन दोन महिने चालले पाहिजे असे म्हणणारे आज सत्तेत आहेत. फडणवीस आज सत्तेत आहेत. ते विदर्भाचे आहेत. त्यांनी अधिवेशन नागपूर करारप्रमाणे चालवले पाहिजे. हिवाळी अधिवेशन दोन महिने घेतले पाहिजे”, असं नाना पटोले म्हणाले.