entertentment : विनोदाचं कमाल टायमिंग आणि प्रेक्षकांना खूर्चीला खिळवून ठेवणारा विनोदवीर दिग्दर्शक व निवेदक डॉ. निलेश साबळेने झी मराठी वहिनीवरील चला हवा येऊ द्या कार्यक्रमातून निरोप घेतला आहे. तो आता या कार्यक्रमाचा भाग नसल्याने त्याचे अनेक चाहते नाराज झाले आहेत. मात्र आगामी काळात निलेश प्रेक्षकांसमोर कोणत्या नवीन भूमिकेत किंवा कोणत्या नवीन कार्यक्रमातून भेटीला येणार? याविषयी चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे.
झी मराठी वहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ गेल्या १० वर्षांपासून हा कार्यक्रम महाराष्ट्राला खळखळून हसवत आहे. लवकरच या कार्यक्रमाचा १००० वा भाग प्रसारित होणार आहे. अशातच आता या कार्यक्रमाचा दिग्दर्शक व निवेदक डॉ. निलेश साबळेने या कार्यक्रमातून निरोप घेतला असल्याचं समोर आलं आहे.
याबद्दल निलेश साबळे म्हणाला की, “चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम गेली अनेक वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे आणि मी या कार्यक्रमाचा एक भाग होतो याचा मला प्रचंड अभिमान आहे. आता काही कारणास्तव मी या कार्यक्रमाचा भाग नसणार आहे. त्यामुळे नुकताच मी या शोमधून बाहेर पडलो आहे आणि याचं कारण म्हणजे मला काही नवीन गोष्टी करायच्या आहेत”.
यापुढे त्याने असं म्हटलं की “सध्या माझं एका चित्रपट व वेबसीरिजचं काम सुरु आहे आणि माझी तब्येत हेदेखील एक मुख्य कारण आहे. गेले काही दिवस माझ्या तब्येतीच्या अनेक तक्रारी वाढल्या आहेत. तर या साऱ्या कारणास्तव मी या शोमधून बाहेर पडलो आहे.”
यापुढे निलेशने त्याच्या आगामी कामाबद्दल असं म्हटलं की, “सध्या माझी एका कार्यक्रमातून बाहेर पडलो असलो तरी लवकरच मी नवीन काहीतरी घेऊन प्रेक्षकांसमोर येणार आहे. मग तो चित्रपट असेल, नाटक असेल किंवा काहीही असेल. तुम्ही आतापर्यंत जे काही अनुभवलं होतं, त्याहीपेक्षा काहीतरी चांगलं आणि छान मी प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहे”.