नवी दिल्ली : अयोध्येतील श्रीराम मंदिराचे उद्घाटन आणि श्रीरामलला प्राणप्रतिष्ठेबाबत केवळ भारतातच नाही तर जगभरातील हिंदूंमध्ये उत्साह आहे. श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा भारताबरोबरच परदेशातही साजरा होणार आहे. अमेरिकेतील मंदिरांमध्येही आठवडाभराचा सोहळा आयोजित केला जाणार आहे.
अमेरिकेतील हिंदू टेम्पल एम्पॉवरमेंट कौन्सिलतर्फे (एचएमईसी) प्रामुख्याने उत्तर अमेरिकेतील मंदिरांमध्ये श्रीरामलला प्राणप्रतिष्ठेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अमेरिकेतील ११०० हून अधिक मंदिरांचे संचालन एचएमईसीतर्फे करण्यात येते.
एचएमईसीच्या तेजल शाह म्हणाल्या की,उत्तर अमेरिकेतील लहान-मोठ्या मंदिरांमध्ये आठवडाभर चालणारा उत्सव 15 जानेवारीपासून सुरू होईल आणि 20 जानेवारीच्या रात्री अयोध्येतून राम मंदिराच्या उद्घाटनाच्या थेट प्रक्षेपणाने हा उत्सव संपेल. कार्यक्रमाच्या शेवटी एक संकल्प घेण्यात येणार आहे. आत्तापर्यंत अनेक मंदिरांनी 15 जानेवारी रोजीपासून सुरू होणाऱ्या सोहळ्यात सहभागी होण्याची तयारी केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.