जळगाव । जळगाव जिल्ह्यात अपघाताचे सत्र सुरूच असून अशातच एरंडोल शहरातील महामार्गावरील अमळनेर नाक्याजवळ रात्री भीषण अपघात झाला. ज्यामध्ये भरधाव टँकरने दुचाकीला धडक दिली. या घटनेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. राजू भिला भोई (वय ४६, रा. एरंडोल) आणि दीपक रामकृष्ण मोरे (वय ३४, रा. शिरसोली ता. जळगाव) असं मृतांचे नाव असून या दुर्घटनेबाबत स्थानिक नागरिक संतप्त व्यक्त करत घडलेल्या घटनेला महामार्ग प्राधिकरणाला जबाबदार धरले आहे. या प्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
राजू भोई यांच्या पुतणीला रविवारी हळद लागली होती आणि आज सोमवारी तिचा विवाह होणार होता. दरम्यान, रविवारी रात्री राजू भोई व दीपक मोरे घराकडे जात असताना हा अपघात झाला.
टँकर (क्र.एम.एच १९/बी.पी. २००३) चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुचाकीला जबर धडक दिली, ज्यामुळे राजू भोई हे जागीच ठार झाले, तर दीपक मोरे जखमी झाले. दीपकला तात्काळ एरंडोल ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, जिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. टँकर पारोळा पोलिस ठाण्यात जमा करण्यात आला आहे.
एरंडोल पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे लग्न घरामध्ये शोककळा पसरली आहे आणि एरंडोल तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. नागरिकांनी न्हाईचे प्रकल्प संचालक शिवाजी पवार यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, असे मागणीसह आंदोलन केले आहे. याच ठिकाणी यापूर्वीही महामार्ग क्रॉसिंगवर अनेक अपघात होऊन निष्पाप लोकांचे बळी गेले आहेत.