अमळनेर : काही व्यक्ती समाजहीतासाठी आपला शेवटचा श्वासही अर्पण करत असतात.वार्धक्याने असो वा आजारपणाने असो अंथरूणाला खिळल्यानंतरही त्यांना कुटूंबासोबतच समाजाच्या हिताचा विचार भेडसावत असतो. समाजातील अनिष्ठ प्रथा, परंपरा असो वा गैरसमज असो ते दूर करण्याचा प्रयत्न ते स्वत: कृतीतून करत असतात. असेच एक समाजधुरींधर आहेत की त्यांनी आयुष्य समाजासाठी अर्पण केले. ते म्हणजे अमळनेंर तालुक्यातील दहिवद येथील दिवंगत माजी आमदार गुलाबराव पाटील.
गुलाबराव पाटील तसे समाजवादी विचारसरणीचे. त्यामुळे समाजातील चुकीच्या रुढी, पंरपरा, गैरसमज दूर करण्यासाठी ते नेहमी प्रयत्न करत. जनतेच्या मानातून अंधश्रध्दा दुर करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न खरोखरच लक्ष्ाात घेण्यासारखे आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे त्यांनी अमावस्येच्या दिवशी स्मशानभुमीत त्यांच्या कार्यकर्त्यांसह केलेली भोजन पार्टी.
त्यांच्या मृत्यूनंतरही विधी करतांना रूढी पंरपरांना फाटा द्यावा ही त्यांची इच्छा ते बोलून दाखवत. त्यांच्या मृत्यूपश्चात सर्व धर्मियांना बोलावून त्यांना भोजन देणे, पितरांना पुरूषांऐवजी सुवासिनींना बोलावून त्यांचा गौंरव करावा असेही ते वेळोवेळी सांगत असत. त्यांच्या सांगण्यानुसार या सर्व बाबी त्यांच्या परिवाराने करत तेराव्या दिवशी पितरांसाठी पुरूषांऐवजी सुवासिनींना बोलावून त्यांचा यथोचित गौरव केला. सर्वधर्मिय लोकांना पितराच्या दिवशी बोलावून त्यांना तांब्याची बाटली व पूज्य सानेगुरूजींच्या विचारांचे एक पुस्तक भेट म्हणून देण्यात आले.
यावेळी समाजातील रियाज मौलाना, काक सिंग बग्गा,येझदी भरूचा, प्रतिभा शिंदे, धनंजय सोनार, जयवंतराव पाटील, पन्नालाल मावळे, विजय बाविस्कर, सोमचंद संदानशिव यांना ही पुस्तके देण्यात आलीत. आपल्या लाडक्या दिवंगत आमदारांच्या स्मृती कायम राहाव्यात म्हणून दहिवदच्या गावकऱ्यांनी विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजनही करण्याचे ठरविले असल्याचे त्यांचे नातू हेमकांत पाटील हे सांगतात.