मुंबई हल्ल्यानंतरही धडा नाहीच : सागरी सुरक्षा अपुरीच

मुंबई :  मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यास पंधरा वर्षे उलटूनही पोलिसांची सागरी सुरक्षा आजही पोकळ असल्याचे धक्कादायक चित्र आहे. किनाऱ्यावर २४ तास गस्त घालण्यासाठी पुरेशा मनुष्यबळाचा अभाव हे त्याचे मुख्य कारण आहे. मुंबईच्या ११४ किमी लांबीच्या समुद्रकिनाऱ्याच्या सुरक्षेसाठी पोलिसांच्या बंदर परिमंडळ आणि मोटर परिवहन विभागात २३०६ मंजूर पदे असूनही, ६८२ पोलिसच कार्यरत आहेत. सागरी सुरक्षेतील हलगर्जीचाच हा दाखला ठरत आहे.

पाकिस्तानचा दहशतवादी अजमल कसाब आणि त्याच्या साथीदारांनी २६ नोव्हेंबर, २००८ रोजी समुद्रमार्गे घुसखोरी करून मुंबईवर हल्ला केला. यानंतर मुंबईच्या किनारा सुरक्षेसाठी पावले उचलण्यात आली. अद्ययावत बोटी खरेदी करण्यात आल्या; मात्र २३ बोटींपैकी केवळ आठच सुस्थितीत आहेत. बंदर परिमंडळ व मोटार परिवहन विभागातील अपुरे मनुष्यबळ हे या ढिसाळपणाचे उदाहरण आहे. बंदर परिमंडळात यलो गेट, वडाळा, शिवडी, सागरी-१ आणि सागरी-२ ही पाच पोलिस ठाणी येतात. या पोलिस ठाण्यांसाठी मिळून २३५ अधिकारी आणि १६०७ कर्मचारी अशी १८४२ पदे मंजूर आहेत. मात्र निम्म्याहून कमी म्हणजे ५१८ पोलिसच कार्यरत आहेत. यामध्ये ८३ अधिकारी आणि ४३५ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. इतक्या कमी संख्येत विस्तीर्ण किनारपट्टीवर २४ तास गस्त घालणे अशक्य असल्याचे पोलिसच सांगतात. गेल्या काही वर्षांमध्ये भरती न झाल्याने मनुष्यबळाचा फटका बसत असल्याकडे एका पोलिस अधिकाऱ्याने लक्ष वेधले.
मुंबई हल्ल्यानंतर स्थापन झालेल्या सुरक्षा समितीने मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावरील सुमारे १०९ लँडिंग पॉइंटपैकी (समुद्रातून जमिनीवर उतरण्याच्या जागा) आठ असुरक्षित पॉइंट शोधून काढले आहेत. मुंबई किनाऱ्यावर उतरता येतील अशा पॉइंटवर नजर ठेवण्यासाठी महाराष्ट्र सुरक्षा बलाची (मसुब) मदत घेण्यात येणार असून, याठिकाणी हे जवान २४ तास तैनात असतील. संवेदनशील आणि असुरक्षित पॉइंटमध्ये बधवार पार्क, गीता नगर, गणेश मूर्ती नगर, वांद्रे-वरळी सी लिंक जेट्टी, जुहू चौपाटी, गोराई, मनोरी आणि वर्सोवा समुद्रकिनारा यांचा समावेश आहे. धोकादायक ठरू शकणाऱ्या दलदलीच्या ठिकाणी ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवण्याचा विचार सुरू आहे.

रिक्त पदांचा प्रश्न

बोटी चालविणे तसेच इतर तांत्रिक कामासाठी मोटार परिवहन विभागाकडून मनुष्यबळ पुरविले जाते. अधिकारी आणि कर्मचारी अशी एकूण ४६४ मंजूर पदे या विभागात आहेत. मात्र, केवळ १६४ जण सद्यस्थितीत काम करत आहेत. यामध्ये ३० अधिकारी आणि उर्वरित कर्मचारी आहेत.

पोलिसांना भोवळ व उलट्या

बोटी चालविणे तसेच इतर तांत्रिक कामासाठी पोलिस उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी असून, ते नौदल, तटरक्षक दलातील माजी जवान आहेत. हे अधिकारी आणि त्यांच्यासोबत असलेले कर्मचारी प्रशिक्षित असून, त्यांना समुद्र आणि पाण्याची सवय आहे. मुंबई पोलिसांकडून मात्र गस्तीसाठी दलातील कुणाही कर्मचाऱ्यास पाठविले जाते. या पोलिसाला पोहता तर येत नसतेच; शिवाय समुद्रातील पाण्याचीही सवय नसते. त्यामुळे स्पीड बोटीतून गस्त घालताना त्यांना मळमळ, भोवळ आणि उलट्या होतात.