मुबारकपूर, ता.शहादा : तालुक्यातील मुबारकपूर येथे जलजीवन मिशनच्या कामाला प्रारंभ झाला. मात्र, गेल्या २५ दिवसांपासून काम ठप्प असल्याने खोदलेले रस्ते जसेच तसे आहे. परिणामी शेतकरी, नागरिकांना बैलगाड्यांसह वाहन काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.
शहादा तालुक्यातील मुबारकपूर येथे एन पावसाळ्यात जलजीवन मिशनच्या कामाला सुरवात करण्यात आली. मात्र, गेल्या २५ दिवसांपासून काम ठप्प असल्याने खोदलेले रस्ते जसेच तसे आहे. त्यामुळे बैल गाडीने शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांना, तसेच नागरिकांना वाहन काढताना मोठी कसरत करावी लागत आहे. शिवाय काही गल्लीत खोदलेले रस्ते बुजण्यात आले असल्याने ठेकेदाराचा मनमानी कारभार सुरु असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे.
ठेकेदाराला कोणत्या लोकप्रतिनिधीचा आशीर्वाद ?
गेल्या २५ दिवसांपासून काम ठप्प असून, देखील लोक प्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे ठेकेदाराला कोणत्या लोकप्रतिनिधीचा आशीर्वाद आहे ? असा सवाल नागरिकांडून केला जात आहे. शिवाय जिल्हा परिषदेने ही बाब गांभीर्याने घेऊन, याबाबत चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.