तरुण भारत लाईव्ह न्यूज । डॉ. सुमन लोढा । हल्लीचा जमाना म्हणजे मोबाईल वापरण्याचा. आजकाल अनेक कामे मोबाईलवरच होत असल्याने तो आवश्यकही असतो. त्याशिवाय पर्यायही नाही. पण तो किती प्रमाणात वापरावा? महत्त्वाच्या वेळी जरुर उपयोग करावा. पण त्याचा अतिरेक जास्त होताना दिसतोय. सगळ्या दिनचर्येचा वेळ एकीकडे आणि मोबाईल वापराचा वेळ दुसरीकडे; असे जर केले तर मोबाईलचेच पारडे जड होईल आणि याचे काहीसे दुष्परिणामही समोर दिसू लागले आहेत. यात डोळे जळणे, डोळ्यातून पाणी येणे, डोळे लाल होणे, अस्पष्ट धुसर दिसणे, भूक न लागणे; पण वजन वाढणे, ऐकू न येणे, आणखी काही त्रास होणे, पण हे अति मोबाईल वापरामुळे होते, हे लक्षातही येत नाही.
मग मनात येतं, बापरे इतकी लक्षणं नक्कीच गंभीर आजाराचे सुचेना. काही झाले की डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागतो. त्यांना भेटण्यासाठी मोबाईलव्दारे संपर्क केला जातो. बाकी मैत्रिणींना, ओळखीच्या लोकांना पण समजावे आपण आजारी आहोत असे. उगीचच सहानुभूती मिळवण्याची धडपड असते. मग काय घेतला मोबाईल हातात. रडका चेहरा करून स्टेटसवर, फेसबूकवर व्हॉटस्ऍपवर फोटो टाकायचा आणि डॉक्टरांकडे जात असल्याची बातमी टाकायची. वसुधानेसुध्दा मोबाईल फोनवरूनच चार-पाच फोन करून कोणत्या डॉक्टरांकडे जाऊ याचा सल्ला घेतला. हुश्श संपलं.
आता निघाले डॉक्टरांकडे. छातीत धडधड. डोळ्यात पाणी, अस्वस्थता, जेवण तर नाहीच. पण शेवटी धीर एकवटून एकदाचे पोहोचले दवाखान्यात. डॉक्टरांच्या ओपीडीमध्ये आपल्या नावाची नंबरची वाट पहात असताना नवरा, मुलांचा राग येत होता. चिडचिडही होत होती. पण नेहमीप्रमाणे सगळ्यांची टाळाटाळ. माझी मेलीची काळजीच नाही. पण ‘हमी भी कुछ कम नहीं’ असे म्हणत नंबर आल्यावर डॉक्टरांच्या कॅबिनमध्ये रडक्या चेहर्याने प्रवेश केला आणि बारीक आवाजात आठवून आठवून तक्रारींचा पाढा वाचला.
डॉक्टरांचा गंभीर चेहरा पाहून भीती अजूनच वाढली. सर्व ऐकल्यावर डॉक्टरांनी व्यवस्थित तपासून पुढील काही तपासण्या करून घ्या म्हणत लॅबचा कागद हातात दिला आणि सायंकाळी येताना मिस्टरांना घेऊन यायचा सल्ला दिला. मी अजूनच गर्भगळीत झाले. धीर एकवटून लॅबचा रस्ता धरला. तपासण्यांना सामोरी गेले.
आता निवांत मोबाईलवरच्या कॉमेंटस्, सूचना सगळं पाहून जरा बरं वाटलं आणि थोडी झोप काढल्यावर मोबाईलवरून फोन करून नवर्याशी भांडण करून त्याला सायंकाळी ‘लवकर या, डॉक्टरांनी रिपोर्टबरोबर तुम्हालाही यायला सांगितले आहे. बहुतेक काही गंभीर आजार असेल.’
दुपारच्या चहानंतर पुन्हा मोबाईल हातात घेऊन गुगलवर आपल्या लक्षणाप्रमाणे कोणता आजार असेल, शेवटी एकदाचे पतीदेव ऑफिसमधून आले आणि आम्ही रिपोर्ट घेऊन डॉक्टरांच्या तपासणी रुममध्ये प्रवेश केला. ह्यांचा हात घट्ट धरून डॉक्टरांकडून आजाराचे निदान ऐकण्यासाठी मनाची तयारी केली. नेहमीप्रमाणे डॉक्टरांचा चेहरा गंभीरच होता. रिपोर्ट पाहून झाल्यावर स्थितप्रज्ञ चेहर्याने डॉक्टरांनी औषधी लिहिल्या. एक महिना ही औषधी घ्या, बरे वाटेल, असे म्हणत पतीकडे औषधांची चिठ्ठी दिली. माझ्या उत्सुकतेकडे लक्ष न देता, ह्यांनी म्हटले, ‘चल घरी’. सर्वांच्या समोर औषधी कशी घ्यावीत ते सांगतो, म्हणजे बरं राहील.
कधी एकदा घरी पोहोचतो असे झाले. त्यांनी डॉक्टरांची चिठ्ठी वाचून दाखवली. मुख्य म्हणजे ह्यापुढे मोबाईल कमी आणि गरजेपुरता वापर करा, असा सल्ला होता.
थोडक्यात, मोबाईलचा अति वापर टाळावा, हेच यानिमित्ताने सुचवावेसे वाटते.