धरणगाव : शेतजमीन अकृषिक जमिनीमध्ये रूपांतरित करण्याकरिता शासकीय फी व्यतिरिक्त एक लाख 42 हजार रूपयांची लाच स्वीकारणाऱ्या नायब तहसीलदाराला ठाणे एसीबीने अटक केली आहे. वासुदेव बिसन पवार (वय 57, रा.धरणगाव, जळगाव) असे लाचखोर नायब तहसीलदाराचे नाव आहे. सोमवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. त्यानंतर जळगाव एसीबीच्या पथकाने नायब तहसीलदार यांच्या धरणगावतील घराची झडती घेतल्याने मोठी खळबळ उडाली.
सूत्रानुसार, 33 वर्षीय तक्रारदार यांच्या परिचयाच्या व्यक्तीची शेतजमीन अकृषिक करावयाची होती. त्यासाठी ठाण्यातील निवासी नायब तहसीलदार वासुदेव बिसन पवार (57) यांनी शासकीय फी व्यतिरिक्त एक लाख 42 हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने अॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार दिली. प्राप्त तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यानुसार सोमवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास सरकारी पंचासमक्ष निवासी नायब तहसीलदार वासुदेव पवार यांनी तक्रारदाराकडून 1 लाख 42 हजार रूपयाची लाच घेताच पकडण्यात आले. त्यानंतर त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, संशयित आरोपी धरणगाव येथील रहिवाशी असल्यामुळे त्यांच्या गावातील घराची झाडाझडती जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संजोग बच्छाव व सहकार्यांनी घेतली. या झडतीत काय आढळले याचा तपशील कळू शकला नाही मात्र या कारवाईने धरणगावात मोठी खळबळ उडाली.