लाच भोवली : शहाद्यातील कार्यकारी अभियंता एसीबीच्या जाळ्यात

शहादा : सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेश प्रतापराव पाटील (रा.फ्लॅट 203, अष्टविनायक टॉवर, थत्ते नगर, गंगापूर रोड, नाशिक) यांना शासकीय कंत्राटदाराकडून पूर्ण केलेल्या कामांच्या देयकासह नवीन वर्कऑर्डर देण्याच्या मोबदल्यात पहिल्या टप्प्यातील साडेतीन लाखांची लाच घेताना नंदुरबार एसीबीच्या पथकाने गुरुवारी रात्री शहादा येथील राहत्या घरातून अटक केल्याने सार्वजनिक बांधकाम विभागातील लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.

राहत्या घरातून केली अटक
35 वर्षीय तक्रारदार हे शहादा तालुक्यातील खैरवेचे रहिवासी असून नोंदणीकृत शासकीय कंत्राटदार आहेत. गत सहा वर्षभराच्या कालावधीत त्यांनी नंदुरबार जिल्ह्यात प्रमुख जिल्हा मार्ग, प्रमुख राज्य मार्ग अशा विविध रस्त्यांच्या नवीन डांबरीकरणाची व डागडुगीची कामे पूर्ण केली असून त्याचे देयक प्रलंबित आहे शिवाय तीन नवीन कामांच्या निविदा मंजूर होऊन त्यांचे कार्यारंभ आदेश (वर्क ऑर्डर) सार्वजनिक बांधकाम विभाग, धुळे या कार्यालयाकडून देण्यासाठी शहाद्यातील कार्यकारी अभियंता महेश पाटील पूर्ण केलेल्या तीन कोटी 92 लाख 79 हजार 285 रुपये बिलासाठी 10 टक्के तर तीन कामांची वर्क ऑर्डर देण्यासाठी .75 ते 1 टक्के प्रमाणे एकूण 43 लाखांची लाच मागितली होती व पहिल्या टप्यात साडेतीन लाख रुपये देण्याचे ठरल्यानंतर तक्रारदाराने लाच द्यावयाची नसल्याने त्यांनी नंदुरबार एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर सापळा रचण्यात आला. गुरुवारी रात्री लाच स्वीकारताच अभियंता पाटील यांना शहाद्यातील शासकीय निवासस्थानातून अटक करण्यात आली.

यांनी केला सापळा यशस्वी
नंदुरबार एसीबीचे पोलिस उपअधीक्षक राकेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक समाधान वाघ, पोलिस निरीक्षक माधवी समाधान वाघ, हवालदार विलास पाटील, विजय ठाकरे, देवराम गावीत, अमोल मराठे, ज्योती पाटील, मनोज अहिरे, संदीप नावाडेकर व जितेंद्र महाले यांच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.