विस्तारलेले आकाशपक्षी!

द़ृष्टिक्षेप

– उदय निरगुडकर

‘या ऑर्डरमुळे आमच्या देशात लाखो नोकर्‍या निर्माण होणार आहेत. आमच्या अर्थव्यवस्थेला बळकटी येणार आहे. त्याबद्दल… या कंपनीचे आणि… या देशाचे आभार…’ वर वर साधं वाटणारं ट्विट! मोकळ्या जागी नावे टाकली तर प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानाने भरून जाईल. तर, त्या कंपनीचं नाव टाटा उद्योग समूह आणि त्या देशाचं नाव आहे भारत! आणि हे ट्विट कोणी केलं, तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी. हवाई वाहतूक क्षेत्रात अलिकडच्या काळातील हा सर्वात मोठा व्यवहार टाटांच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवून गेला. जगातल्या कोणत्याही महाशक्तीला आपण टक्कर देऊ शकतो, हा आत्मविश्वास सर्वसामान्य भारतीयांना देणारा हा क्षण.

खरं तर दीड-दोन वर्षांपूर्वी अनागोंदी कारभार, आर्थिक बेशिस्त, दिवसाला 20 कोटी रुपयांचा तोटा यामुळे अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेला एअर इंडियाचा महाराजा आता पश्चिमेच्या क्षितिजाकडे गर्वाने पाहतोय्. 18 महिन्यांपूर्वी टाटा उद्योग समूहाने एअर इंडिया विकत घेतली आणि त्याचा कायापालट केला. मिठापासून सॉफ्टवेअरपर्यंत आणि ट्रकपासून विमान वाहतुकीपर्यंत असा या उद्योग समूहाचा साम्राज्यविस्तार आहे. विमान वाहतूक आणि टाटा यांचे घट्ट जिव्हाळ्याचे संबंध आहेत. भारतात प्रवासी Air transport हवाई वाहतुकीची मुहूर्तमेढ जेआरडी टाटा यांनी रोवली. त्यांनीच एअर इंडियाची स्थापना केली. पुढे सरकारने त्याचे सरकारीकरण करून मातीच केली. जानेवारी 2022 मध्ये टाटा उद्योग समूहाने एअर इंडिया विकत घेतली तेव्हा तिचे स्वागत करताना रतन टाटा यांनी भावनाविवश ट्विट केले होते. पुढच्या कायापालटाचा इतिहास हा कोणत्याही व्यवस्थापन महाविद्यालयात केस स्टडी म्हणून शिकवायला उपयुक्त आहे. प्रचंड तोटा, जुनाट नादुरुस्त विमाने, गचाळ सेवा आणि गलथान व्यवस्थापन यावर टाटांनी तातडीने पावले उचलली. नवीन विमान खरेदी ही प्राथमिकता होती. म्हणूनच विमाने बनवणार्‍या कंपन्यांनी भारतात येऊन शक्तिप्रदर्शन करायला सुरुवात केली. त्यात कोण नव्हते? बोईंग, एअरबस, ब्रिटन-व्हिटनी… एक ना दोन अशा अनेक तगड्या कंपन्या यात होत्या. भारतामध्ये एअरबस-350 हे विमान आजवर उड्डाणासाठी वापरले गेले नव्हते. मार्च महिन्याच्या सुरुवातीला एअरबस कंपनीने या विमानाचे मुंबई-दिल्ली हे उड्डाण केले आणि एअर इंडियातील वैमानिकांना ए-350 या विमानाच्या उड्डाणाचे तांत्रिक प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची सूचना मिळाली. माध्यमांमध्ये टाटा उद्योग समूह विमाने खरेदी करीत आहे, अशी बातमी लीक झाली. तरीदेखील एकूण किती विमाने खरेदी केली जातील, याचा कोणालाही अंदाज नव्हता.

डबलिनमध्ये एका लिझिंग कॉन्फरन्समध्ये ‘एअरलीज’ कंपनीच्या प्रमुखांनी टाटा उद्योग समूह तब्बल 500 विमाने खरेदी करीत आहे, असा गौप्यस्फोट केला आणि सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. टाटा उद्योग समूहासाठी कंपन्या विकत घेणे, आपल्यात समाविष्ट करून घेणे हे काही नवे नाही. या आधी ‘टेटली’ ही चहा कंपनी आणि ‘जग्वार’ ही चारचाकी कंपनी टाटा उद्योगात समाविष्ट झाली होती. परंतु ही ऑर्डर इतकी मोठी असेल, याचा कोणालाही अंदाज नव्हता. दिवाळीपासून या उलाढालीशी संबंधित प्रत्येक बाब अत्यंत नियोजनपूर्वक आणि गांभीर्याने चर्चेला आली, तपासली गेली. त्यावर काटेकोर चर्चा झाली. Air transport विमान खरेदीची प्रक्रिया अतिशय गुंतागुंतीची आणि क्लिष्ट असते. ती समाधानकारकरीत्या पूर्ण करून 14 फेब्रुवारी या दिवशी एअरबस या कंपनीकडून 250 विमाने आणि बोईंग या कंपनीकडून 190 विमाने खरेदी करणार असल्याचे जाहीर करण्यात आले आणि एका क्षणात एअर इंडियाकडे, टाटा उद्योग समूहाकडे आणि भारताकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोनच बदलला. अर्थातच यात वाईड बॉडी, नॅरो बॉडी अशा अनेक प्रकारच्या विमानांची खरेदी होणार आहे. त्यामुळे प्रवासी हवाई वाहतूक क्षेत्रात क्रांती घडणार आहे, यात शंकाच नाही. इतकी मोठी ऑर्डर असल्यामुळे त्यावर सवलतदेखील तितकीच घसघशीत आणि विमान बनवणार्‍या कंपनीला आणि त्या देशाला मोठा आर्थिक फायदा होणार, यात शंकाच नाही. म्हणून या तिन्ही प्रगत देशातील प्रमुखांनी भारताचे आभार मानले.

टाटा उद्योग समूहाकडे  आज ‘विस्तारा’ आणि ‘एअर इंडिया’ ही संपूर्ण सेवा देणारी कंपनी तसेच एअर इंडिया एक्सप्रेस, एअर आशिया या कमी किमतीत चालणार्‍या कंपन्या अशी विविधता आहे. येत्या काळात या उद्योग समूहातील विविध हवाई वाहतुकीचे नियोजन करून सुटसुटीतपणा येईल. एअरबस आणि बोईंग या दोन कंपन्यांमध्ये ऑर्डर विभागून देण्याचे कारण म्हणजे कोणा एकावरचे अवलंबित्व टाळणे आणि दुसरे म्हणजे कोणा एकाकडे एवढी विमान विविधता नव्हती. हे सगळे थक्क करणारे आहे. ‘एअर इंडिया’मध्ये सध्या खूप मोठ्या प्रमाणात व्यवस्थापन बदलाचे वारे वाहात आहेत. उत्पादकता आणि ग्राहकभिमुखता याला प्राधान्य मिळत आहे. दर आठवड्याला विमान प्रवास करणार्‍या असंख्य प्रवाशांना या बदललेल्या व्यवस्थापनाचा अनुभव येत आहे. शेवटी कर्मचारी तेच. विमानही तेच. पण व्यवस्थापन, कार्यसंस्कृती आणि माणसांच्या अंत:प्रेरणांना हाक दिली की काय घडते, त्याचे हे दर्शन आहे. टाटांनी नोंदवलेल्या ऑर्डरएवढी मोठी ऑर्डर वाहतूक क्षेत्रात यापूर्वी क्वचितच नोंदवली गेली असेल. या वर्षाच्या अखेरीपासून ही नवी विमाने भारतात यायला सुरुवात होईल. एअरबस या कंपनीची विमान बनवण्याची क्षमता दरमहा 65 एवढी आहे. या आधी अशा प्रकारच्या भव्य दिव्य ऑर्डर्स ‘एमिरेटस्’ या कंपनीने दिल्या होत्या. आता आकाशातील अमिरात बनण्याचा मान टाटाच्या महाराजाला मिळाला हे महत्त्वाचे.

हे सर्व शक्य झाले ते देशातील बदललेल्या वातावरणामुळे. बदललेल्या Air transport हवाई वाहतूक धोरणामुळे. सरकार या क्षेत्रातून बाहेर पडले ते उत्तमच झाले. कारण ही झेप सरकारी बाबूंना परवडणारी नव्हती. आता एवढी विमानं येणार म्हणजे विमानतळाच्या क्षमता वाढणार, विमानतळं वाढणार. दिल्लीहून विमान उड्डाण करताना दिसणारे तिथे सुरू असलेल्या चौथ्या उड्डाणपट्टीचे काम नजरेत भरणारे आहे. दिल्लीत आणि मुंबईत दुसर्‍या विमानतळाचे काम प्रगतिपथावर आहे. अनेक राज्यांमध्ये छोटी विमानतळे विकसित होत आहेत. याचाच अर्थ प्रवासी संख्यादेखील अनेक पटींनी वाढणार. मध्यंतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य माणसाला विमान वाहतूक परवडेल असे सुतोवाच केले होते. ‘इंडिगो’ या कंपनीने या आधीच विमानांची अशी मोठी ऑर्डर नोंदवली आहे. दिवंगत उद्योजक राकेश झुनझुनवाला यांच्या ‘अकासा एअरलाईन्स’ने 72 विमाने खरेदी करण्याची तयारी केली आहे. प्रवासी विमान वाहतुकीच्या क्षेत्रात प्रचंड स्पर्धा आणि संधी आहे. प्रवासी विमान वाहतूक सोपी नाही. मुंबई-दिल्ली विमान संपूर्णपणे प्रवाशांनी भरून उड्डाण केले जाते, रुपया आणि डॉलरचे भाव स्थिर असतात, विमान इंधनाच्या किमती स्थिर असतात आणि उतरताना विमानाला घिरट्या घालाव्या लागल्या नाहीत तर विमान वाहतूक कंपनीला जेमतेम तीन ते चार पैसे दर प्रवासी, दर किलोमीटर फायदा होत असतो. यावरून विमान वाहतूक व्यवस्था चालवणे किती जिकिरीचे आहे, हे लक्षात येईल. या सगळ्यामुळे भारतात नोकर्‍यांच्या संधी वाढणार. इथले इन्फ्रान्स्ट्रक्चर सुधारत आहे. लोकांचा दृष्टिकोन विस्तारत आहे. स्वप्नांचे आकाश बदलत आहे. या ऑर्डरच्या निमित्ताने एका नव्या भारताच्या उदयाची नांदी होत आहे.

– 9820066446

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)