मुंबई | मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच हवामानात बदल झाला आहे. शनिवारी सकाळपासून अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे. हवामानातील या बदलामुळे त्यामुळं ४ ते ८ मार्चपर्यंत ढगाळ वातावरण राहिल तसंच अवकाळी पावसाची शक्यता आहे. पश्चिमी चक्रवाताच्या प्रभावामुळे उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस व बर्फवृष्टी होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे दक्षिण मध्य प्रदेश व गुजरात आणि उत्तर कोकण या भागांवर परिणाम होणार आहे.
पूर्वेकडून येणारे वारे आणि उत्तर-दक्षिण ढगांची द्रोणीय स्थिती तसेच अरबी समुद्रातून नैऋत्येकडून वायव्य भारताच्या दिशेने सरकणारे पण उत्तर महाराष्ट्राकडे वळणार्या आर्द्रतायुक्त वार्यांचा मिलाफ होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार शनिवार आणि रविवारी धुळे, नंदुरबार, जळगाव नाशिक जिल्ह्यात हलक्या सरींसह मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. तर, रविवार आणि सोमवार मराठवाड्यात औरंगाबाद आणि जालना येथेही हलक्या सरींची शक्यता आहे.
४ मार्च रोजी नागपूर, वर्धा, चंद्रपूर, अमरावती, अकोला आणि बुलढाण्यात मेघगर्जनेसह वीजा आणि हलक्या सरींची तुरळक ठिकाणी शक्यता आहे. पालघर जिल्ह्यात ४ ते ६ मार्च दरम्यान अंशत: ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडू शकतात. अवकाळी पावसामुळं पिकांना फटका बसण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. द्राक्ष काढणीला आल्याने त्यातच पाऊस झाल्यास शेतकर्यांचे मोठे नुकसान होऊ शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.