RTE 2023: शाळा प्रवेश घेण्यासाठी वाढीव वेळ मिळणार, शिक्षण संचालकांच्या पालकांना सूचना

तरुण भारत लाईव्ह न्यूज : आरटीई २५ टक्के प्रवेशप्रक्रियेद्वारे खासगी इंग्रजी शाळेत प्रवेशासाठी निवड झालेल्या बालकांना शाळा प्रवेश घेण्यासाठी वाढीव वेळ दिला जाणार आहे. प्राथमिक शिक्षण संचालकांनी तशा सूचना जारी केल्या आहेत.

यंदाच्या आरटीई प्रवेशासाठी ५ एप्रिलला ऑनलाइन सोडत काढण्यात आली. ज्या बालकांची निवड यादीत प्रवेशासाठी निवड झाली त्या बालकांच्या पालकांना १३ ते २५ एप्रिल या कालावधीत पंचायत समिती किंवा महापालिका स्तरावरील पडताळणी समितीकडे जाऊन कागदपत्रे तपासून घेऊन बालकाचा ऑनलाइन प्रवेश निश्चित करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या, मात्र यादरम्यान प्रवेशासाठी एकाचवेळी लाखो पालक वेबसाईट वापरत असल्याने अतिरिक्त भार येऊन वेबसाईट बंद झाली होती. यात पालकांचे प्रवेश घेण्यासाठीचे दोन ते तीन दिवस वाया गेले.

एसएमएसद्वारे प्रवेश मिळाल्याचे पालकांना कळविले जात असले तरी प्रत्यक्ष वेबसाईटवर लॉगीन करूनच पालकांनी प्रवेश मिळाल्याचे कन्फर्म करावे, अशा सूचना पालकांना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार पालक वेबसाईटवर लॉगीन करून अर्जाची स्थिती, प्रतीक्षा यादीतील क्रमांक जाणून घेण्याचा प्रयत्न करीत होते, मात्र वेबसाईटच बंद असल्याने पालकांना ही माहिती घेता आलेली नाही. शाळा प्रवेश घेण्यासाठी, कागदपत्रांच्या पडताळणीसाठी अतिरिक्त वेळ मिळेल का, अशी विचारणा पालक करीत होते. याची दखल घेत शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी प्रवेश घेण्यासाठी पुरसा कालावधी देण्यात येईल असे स्पष्ट केले.

राज्यात आरटीई प्रवेशाच्या एकूण १ लाख १ हजार ८४६ जागा आहेत. ऑनलाइन सोडतीत ९४ हजार ७०० विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड करण्यात आली असून यापैकी अद्याप ६५० बालकांनी ऑनलाइन प्रवेश घेतले आहेत.

या जिल्ह्यांमध्ये एकही ऑनलाइन प्रवेश निश्चित झाला नाही…

अकोला, चंद्रपूर, धुळे, हिंगोली, लातूर, नांदेड, नंदुरबार, परभणी, रायगड, सिंधुदुर्ग आणि वाशिम जिह्यांतून निवड यादीत नाव आलेल्या एकाही बालकाने अद्याप ऑनलाइन प्रवेश निश्चित केलेला नाही.