मुंबई । राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. केंद्र सरकारने प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत असलेल्या शेतकऱ्यांसाठी पीकविमा भरण्याची मुदत वाढवली आहे. 31 जुलैपर्यंत पीकविमा भरण्याची मुदतवाढ दिली आहे. राज्य सरकारने केंद्राकडे मुदत वाढवण्याची मागणी केली होती. त्यानंतर प्रधानमंत्री पिकविमा योजनेअंतर्गत एक रुपयात पीक विमा भरण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदवाढ करण्यात आली आहे.
प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत एक रुपयात पीक विमा भरण्याची १५ जुलै ही अंतिम मुदत देण्यात आली होती. मात्र राज्यातील अनेक शेतकरी अद्यापही काही कारणामुळे पिक विमा भरण्यापासून वंचित राहिले होते. त्यामुळे त्यांना संधी मिळावी यासाठी पिकविमा भरण्यास मुदतवाढ मिळावी, अशी मागणी राज्याचे कृषिमंत्री मुंडे यांनी केंद्र सरकारकडे केली होती. त्यांच्या मागणीला यश आलं. त्यांच्या मागणीनंतर ही मुदत 31 जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे.
सध्या राज्यात विविध योजनांसाठी लाभार्थींची कॉमन सर्विस सेंटर (CSC)च्या केंद्रांवर गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. या पिकविम्यासाठी शेतकऱ्यांना अर्ज आणि लागणारे कागदपत्रे जोडताना सर्व्हरची गती मंद झाल्याचे समोर आले. त्यामुळे अनेक शेतकरी पिक विमा योजनेपासून वंचित राहत होते. या पार्श्वभूमीवर पिक विम्याचा अर्ज करण्यास मुदतवाढ मिळावी, यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने पत्र व्यवहार करण्यात आला होता.