काँग्रेसमधील गटबाजी; तिकीट मागणाऱ्यांना कमलनाथांचा सल्ला जा आणि दोन नेत्यांचे कपडे फाडा

भोपाळ : मध्य प्रदेशात काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर बंडखोरी आणि निषेध करण्यात येत आहे. भाजपा सोडून काँग्रेसमध्ये दाखल झालेले कोलारसचे आमदार वीरेंद्र रघुवंशी यांचे तिकीट शेवटच्या क्षणी रद्द केल्याने वादाला तोंड फुटलं आहे. असंतुष्ट कार्यकर्त्यांनी मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष कमलनाथ यांची भेट घेऊन पक्षाच्या निर्णयाला विरोध दर्शवला. यावेळी कमलनाथ यांनी काँग्रेसच्या दोन दिग्गज नेत्यांचेच कपडे फाडण्याचे विधान केले आहे. याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा समोर आली आहे.

भोपाळमध्ये माजी मुख्यमंत्री कमलनाथ शिवपुरी जिल्ह्यातून आलेल्या लोकांना म्हणाले, तुम्ही लोक इथे बंड करू नका. दिग्विजय सिंह आणि जयवर्धन यांच्याकडे जा आणि त्यांचे कपडे फाडा. याचा अर्थ, व्हिडिओमध्ये कमलनाथ वीरेंद्र रघुवंशी समर्थकांना सांगत आहेत की, त्यांनी आता दिग्विजय सिंह आणि त्यांचे आमदार पुत्र जयवर्धन सिंह यांच्याशी याबाबत बोला. भाजपाने आता या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

मध्य प्रदेश भाजपाचे मीडिया प्रभारी आशीष अग्रवाल यांनी निशाणा साधला आहे. “”दिग्विजय सिंह आणि जयवर्धनचे कपडे फाडून टाका…” अहो कमलनाथ जी, तुम्ही कपडे फाडायला तयार झालात. बरं, अख्खी काँग्रेस फाटली असताना तुम्ही काय करू शकता? दिग्विजय सिंह जी, शिवपुरीहून आलेल्या वीरेंद्र रघुवंशी यांच्या समर्थकांमध्ये कमलनाथजींसोबत झालेल्या संभाषणाचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला आणि तुमच्या मुलाला नक्कीच वेदना जाणवतील आणि बदलाही घ्याल. आता कोण कोणाचे कपडे फाडणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.” असं म्हटलं आहे.

भाजपाच्या आयटी सेलचे प्रभारी अमित मालवीय यांनीही व्हिडीओ शेअर केला आणि लिहिलं, “तिकीट मागणाऱ्यांना कमलनाथांचा सल्ला: जा आणि दिग्विजय सिंह आणि जयवर्धन यांचे कपडे फाडा… राजस्थानपासून छत्तीसगडपर्यंत काँग्रेसमध्ये अंतर्गत भांडण सुरू आहे. जनतेचं यात नुकसान होतं. यांना सत्तेपासून दूर ठेवणं हाच उपाय आहे.”