मराठा आरक्षणावरुन फडणवीसांचा शरद पवारांवर गंभीर आरोप; म्हणाले…

नागपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत कार्यकर्त्यांना संबोधित करताना मराठा आरक्षणावरून विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मराठा आरक्षणाला सर्वात मोठा विरोध शरद पवारांचा राहिलेला आहे, असा घणाघात यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केला. यावेळी त्यांनी उध्दव ठाकरेंचाही समाचार घेतला.

शरद पवारांवर निशाणा साधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “सध्या राज्यात मराठा आरक्षणाची मोठमोठी आंदोलने सुरू आहेत. मात्र आपण मराठा आरक्षण आंदोलनाचा इतिहास काढून पाहिला तर लक्षात येतं की, मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध हा शरद पवारांनी केला आहे. महाविकास आघाडी सरकार असतानाही आपण सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य ऐकलं होतं की मराठा आरक्षणापेक्षाही राज्यात इतर मोठे प्रश्न आहेत. शरद पवारांच्या मनात असतं तर मंडल आयोग लागू झाला तेव्हाही मराठा आरक्षण देता आलं असतं, पण पवारांना कधी मराठा आरक्षण द्यायचंच नव्हतं. त्यांना दोन समाजांना झुंजवत ठेवायचं होतं. लोकं झुंजत राहिले तर आपल्याकडे नेतेपद येईल, असं त्यांचं राजकारण आहे.”

देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांचाही समाचार घेतला. “आपलं सरकार असताना आपण मराठा समाजाला आरक्षण दिलं. ते आरक्षण आपण हायकोर्टात टिकवलं, सुप्रीम कोर्टातही आपलं सरकार असेपर्यंत हे आरक्षण टिकलं होतं. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं तर मंडल आयोगालाही विरोध केला होता. तुम्ही मंडल आयोगाला विरोध केल्यामुळेच छगन भुजबळ शिवसेनेतून बाहेर पडले होते आणि आता तुम्ही तोंड वर करून बोलताय,” असं फडणवीस म्हणाले.

दरम्यान, “मराठा आरक्षण देण्यासाठी आपली कमिटमेंट पक्की आहे. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आपण मराठा आरक्षणासाठी पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत. मात्र हे आरक्षण देताना आपण ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही. काही झालं तरी ओबीसी आरक्षणावर संकट येऊ देणार नाही,” अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाची भूमिका स्पष्ट केली. तसंच आरक्षणाच्या आंदोलनाचा निवडणुकीवर परिणाम होणार नाही. निवडणुकीचे मुद्दे वेगळे असतात, या आंदोलनांचा सामाजिकदृष्ट्या विचार केला पाहिजे, असंही फडणवीस यांनी म्हटलं.