पुणे : ‘महाविकास आघाडीचा पोपट केव्हाच मेला आहे, हे महाविकास आघाडीच्या नेत्यांनाही कळून चुकले आहे; पण हा पोपट जिवंत आहे, हे आपल्या कार्यकर्त्यांना कळावे, म्हणून आघाडीचे नेते बोलत आहेत,’ असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर टीका केली होती. फडणवीसांच्या टीकेला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलंय. फडणवीस-पवारांमधील या वाकयुद्धमुळे महाराष्ट्राचं राजकीय वातावरण चांगलच ढवळून निघालं आहे.
पुण्यातील कार्यक्रमात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना फडणवीसांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली होती. त्याला प्रतिउत्तर देतांना अजित पवार म्हणाले की, कर्नाटकच्या निकालानंतर कार्यकर्त्यांना बुस्ट देण्यासाठी केलेलं हे भाषण आहे, असं बोलावं लागतो. त्यांच्याजागी आम्ही असतो तरी असेच भाषण केले असते. पुढं राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडच्या निवडणुका आहेत. म्हणून केलेलं ते राजकीय भाषण होतं, ते फार गंभीरतेनं घ्यायची गरज नाही, असा मिश्किल टोला त्यांनी फडणवीसांना लगावला.
पोपट मेला, अरे दाखवा तरी कुठं पोपट मेलाय तो. उगं त्यांनी म्हणायचं पोपट मेला, आम्ही म्हणायचं मैना मेली, कुणी म्हणायचं मोर मेला. कुणी मेलेलं नाही, सगळं काही जनतेच्यासमोर आहे. जनतेच्या मनात जे असतं ते जनता करून दाखवते. जनतेचा तो अधिकार आहे, जो संविधानाने त्यांना दिलेला आहे. त्यामुळे, पोपट मेला, पोपटीन मेली असं म्हणण्याचं काही कारण नाही. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेलं नाही. काँग्रेसला सुद्धा पराभव पत्कारावा लागला आहे, असे म्हणत अजित पवार यांनी फडणवीसांच्या भाषणावर टोला लगावला.