देवेंद्र फडणवीसांनी जखमी मराठा आंदोलकांची मागितली माफी

मुंबई : जालना येथील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या मराठा आंदोलकांवर लाठीमार झाल्याने राज्यात संतापाचं वातावरण आहे. या लाठीमाराला उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणासंदर्भात आज प्रसार माध्यमांशी संवाद साधताना आंदोलनात जखमी झालेल्या मराठा आंदोलकांची सरकारच्यावतीने क्षमा मागितली आहे. ही दुर्दैवी घटना आहे. तसेच अशा प्रकारच्या बळाच्या वापराचे समर्थन केलं जाऊ शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केलं.

फडणवीस म्हणाले की, मी आधीही पाच वर्षे गृहमंत्री होतो. त्या काळात आरक्षणासंदर्भात वेगवेगळ्या प्रकारची दोन हजार आंदोलनं झाली. परंतु कधीही आम्ही बळाचा वापर केलेला नाही. तसेच आताही बळाचा वापर करण्याचं कारण नव्हतं. त्यामुळे ज्या निष्पाप नागरिकांना बळाच्या वापरामुळे इजा झाली आहे. जे जखमी झाले आहेत त्यांच्याप्रति मी शासनाच्या वतीने क्षमायाचना करतो. या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. तसेच या संदर्भातील दोषींवर कारवाई करण्याचा निर्णयही मुख्यमंत्र्यांनी घेतला असल्याचे ते म्हणाले.

या घटनेचं राजकारण व्हावं हे देखील योग्य नाही. काही पक्षांनी, काही नेत्यांनी तोही प्रयत्न केला हे दुर्दैवी आहे. विशेषत: जाणीवपूर्वक लाठीमाराचे आदेश मंत्रालयातून आले. वरून आले. अशा प्रकारचे नरेटिव्ह तयार करण्याच प्रयत्न झाला. लाठीमार करण्याचे आदेश देण्याचा अधिकार एसपी आणि डीवायएसपी दर्जाच्या अधिकाऱ्यांना असतात. त्यासाठी कुणाच्या आदेशांची गरज नसते, हे या नेत्यांनाही माहिती आहे.

मग माझा सवाल आहे की, ज्यावेळी निष्पाप ११३ गोवारी पोलिसांच्या हल्ल्यात मारले गेले तेव्हा तसा आदेश कुणी दिली होता. तो मंत्रालयातून आला होता. मावळमध्ये शेतकरी मृत्युमुखी पडले तेव्हा ते आदेश कुणी दिले. तेव्हाचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले होते का, तेव्हा त्यांनी राजीनामा का दिला नाही. त्यामुळे मुळातच घटना चुकीचीच आहे. मात्र त्याचं राजकारण करून सरकार हे करतंय, असं दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र लोकांनाही हे राजकारण सुरू आहे, हे कळतंय, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.