कैग की रिपोर्ट में ट्रेलर है, तस्वीर अभी बाकी है; फडणवीसांनी दिला थेट इशाराच

मुंबई : मुंबई महापालिकेला १२ हजार कोटींच्या कामाचे कॅग कडुन ऑडिट करण्यात आले आहे. यात निधीचा गैरवापर केल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान हा अहवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सादर केला. यावेळी कॅगचा अहवाल ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे. असे म्हणत त्यांनी थेट इशाराच दिला आहे.
कॅगकडून करण्यात आलेल्या ऑडिटमध्ये कोरोना काळात केलेल्या कामांचे ऑडिट करण्यात आले असून यामध्ये पारदर्शकतेचा अभाव दिसून आला आहे. या अहवालामुळे महापालिकेचा भोंगळ कारभार उघड झाला आहे. निधीचा गैरवापर केल्याचे अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. “महापालिकेच्या २ विभागांची २० कामे टेंडरशिवाय देण्यात आलेली आहेत. माहिती तंत्रज्ञान विभागात निविदा न मागवताच टेंडर देण्यात आले आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील कामांचे बजेट वाढविण्यात आलेले आहे. रस्ते आणि वाहतूकमध्ये ५१ कामे सव्र्हेंशिवाय केली आहेत.”अशी माहिती उपमुख्यमंत्र्यांनी दिली.
“२१४ कोटींची कामे टेंडरशिवाय करण्यात आली आहेत. ६४ ठेकेदार आणि महापालिकेमध्ये करार झालेले नाहीत. सॉलिड वेस्टच्या कामात पालिकेकडून हलगर्जीपणा केल्याचे अहवालात म्हटले आहे. शहरातील मिठी नदीच्या प्रदूषणाबाबतची कामे ४ ऐवजी एकाच कंत्राटदाराला देण्यात आली. अशी एकूण १२ हजार कोटींच्या कामाची चौकशी करण्यात आली आहे. यात निधीचा निष्काळजीपणाने वापर करण्यात आल्याचे आढळून आले आहे. तसेच मान्यता नसताना बीएमसीने कामे दिल्याचे स्पष्ट झाले आहे. कोणत्याही कराराशिवाय कामे केल्याने महापालिकेला कारवाई करण्याचा अधिकार नाही, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.” अशी माहिती फडणवीस यांनी दिली.