मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादात बेळगाव-हिरेबागवाडी येथील टोल नाक्यावर महाराष्ट्र पासिंगच्या ट्रकवर कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून दगडफेक करण्यात आली. या घटनेमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण देखील ढवळून निघाले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना दूरध्वनी करुन आक्रमकपणे भूमिक मांडली. फडणवीसांनी बेळगावनजीक हिरेबागवाडी येथे झालेल्या घटनांबद्दल तीव्र शब्दात आपली नाराजी नोंदविली. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी या घटनांमध्ये लक्ष घालून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे सांगितले.
बेळगाव-हिरेबागवाडी येथे महाराष्ट्र पासिंगचे ट्रक लक्ष्य करण्यात आले आहेत. यात ६ ट्रकचं नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्राच्याविरोधात कन्नड रक्षण वेदिकांची घोषणाबाजी सुरू असून कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राचे ट्रक रोखून त्यावर दगडफेक करण्यास सुरुवात केली. यावेळी कन्नड रक्षण वेदिका आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाण्याचा मारा सुरू केला.