मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर अखेर १७ व्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सुरु केलेले उपोषण मागे घेतलं. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मनोज जरांगे पाटील यांच्या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केलं आहे. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारच्या कामाची कशी दिशा असेल? याची सविस्तर माहिती दिली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर म्हटलं आहे की, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे तसेच मंत्रिमंडळातील अन्य सहकार्यांच्या उपस्थितीत आज मागे घेतले, ही समाधानाची बाब आहे. मराठा आरक्षणाबाबतीत आम्ही प्रारंभीपासून सातत्याने प्रयत्नरत राहिलो. ते आम्ही दिले आणि हायकोर्टात टिकले सुद्धा. सुप्रीम कोर्टात ते का टिकले नाही, यावर मत व्यक्त करण्याची आज वेळ नाही.
मात्र, सारथी, छत्रपती राजर्षि शाहू महाराज शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजना, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून उद्योजकतेला प्रोत्साहन, अधिसंख्य पदांची भरती अशा अनेक उपाययोजना अंमलात आणण्यात आल्या. आजही या सर्व बाबतीत अतिशय गतीने काम सुरु आहे. भविष्यात सुद्धा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्त्वात मराठा आरक्षण, तसेच मराठा समाजाच्या कल्याणकारी योजनांसाठी आमचे सरकार प्रयत्नांची शर्थ करेल, असेही फडणवीस यांनी ट्विटरवरुन म्हटलं आहे.
मुख्यमंत्री शिंदेंनी जरांगे पाटलांच्या कामाचं कौतुक केलं. “मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही” असं म्हटलं आहे. तसेच मनोजला भेटायचं हे मी ठरवलं होतं. आपली भूमिका मी अगदी स्पष्टपणे मांडली आहे, उपोषण सोडलं त्याबद्दल आभारी आहे असंही शिंदेंनी सांगितलं.