संजय राऊतांच्या ‘त्या’ आरोपावर फडणवीस म्हणाले, त्यांना..

मुंबई : खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडून आपल्या जीवाला धोका असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ज्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. याबद्दलचे पत्रही त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहे. दरम्यान, आता यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “संजय राऊत यांनी जी तक्रार दिली आहे ती तक्रार सुरक्षेसाठी दिले आहे की, सनसनाटी निर्माण करण्यासाठी आहे त्याची चौकशी केली जाणार,” असल्याचे सांगितले आहे.

याबद्दल पुढे बोलताना त्यांनी “सुरक्षा व्यवस्थेचा विषय घेऊन तो राजकारणाशी जोडणं चुकीचे आहे. मात्र संजय राऊत गेल्या काही दिवसांपासून त्यांना प्रसिद्धीची सवय लागली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून बिनडोकपणाचे आरोप केले जात आहेत,” असा हल्लाबोलही त्यांनी सूत्रांशी बोलताना केला.

दरम्यान, राज्यात सध्या चिंचवड आणि कसबा पोट निवडणूकीची रणधुमाळी सुरू आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह अनेक भाजपा नेते सध्या पुण्यात तळ ठोकून आहेत. या निवडणूकीबद्दल बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी “चिंचवड पोट निवडणूकीची जागा आम्ही जिंकू,” असा विश्वास व्यक्त केला आहे.