नागपूर : सीमावादाच्या प्रश्नावर सरकार विधिमंडळात ठराव आणणार होते. अद्याप ठराव का आणला नाही? असा सवाल विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला. कर्नाटकने ठराव आणला आणि कारण नसताना सीमावाद चिघळला, अशी टीका अजित पवार यांनी केली. परिस्थिती चिघळवायचा प्रयत्न करू नका, असा गंभीर इशारा महाराष्ट्राने दिला पाहिजे, असं माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. या विषयावर सभागृह एक आहे. आपल्याला या विषयावर वातावरण बिघडू द्यायचं नाही, आपल्याला एक राहायचं आहे, असं उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांच्या गदारोळावर स्पष्ट केलं.
कर्नाटकविरोधात आपलं ठराव आणण्याचं ठरलं होतं. मागच्या आठवड्यातलं वातावरण जरा गंभीर होतं. त्यामुळे तो आणता आला नाही. आज तो आणण्याचा निर्णय होता. पण मुख्यमंत्र्यांना केंद्र सरकारकडून निमंत्रण आलं आणि महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी त्यांना दिल्लीला जावं लागलं. मुख्यमंत्री शिंदे हे दिल्लीला गेलेत, ते दुपारी परणार आहेत. मुख्यमंत्री आज दुपारपर्यंत येतील. शक्य झाल्यास आज नाहीतर उद्या आपण हा ठराव निश्चितपणे मांडू. यासंदर्भात तसूभरही महाराष्ट्राचं सरकार मागे हटणार नाही, अशी ग्वाही मी सभागृहाला देतो, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.