फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा, म्हणाले किती लाजिरवाणी..

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबई सुशोभीकरण अंतर्गत अतिरिक्त 320 कामांचे भूमीपूजन करण्यात आले. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला. दरम्यान, त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत अप्रत्यक्ष टीका केली.

काय म्हणाले फडणवीस?
फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका केली. ते म्हणाले, वर्षानुवर्षे पावसाळ्यात तीन ते चार महिने मुंबईच्या रस्त्यांवरील खड्ड्यांचे चर्चा असते. किती लाजिरवाणी गोष्ट आहे. ज्या महानगरपालिकेकडे एवढे पैसे आहेत त्यांच्याकडून चांगले रस्ते करण्याचे काम होत नाही.

फडणवीस म्हणाले, दरवर्षी मुंबईच्या लोकांना खड्ड्यात टाकायचे ही नीती दूर केली. एकदा रस्ता केला की पंचवीस वर्ष काम करण्याची गरज नाही. येत्या दोन वर्षात मुंबई खड्डे मुक्त होणार आहे. आता जनतेचा पैसा हा जनतेसाठीच वापरला जाईल. आपलं सरकार मुंबईचा कायापालट करत आहे.

फडणवीस यांनी व्यक्त केला आनंद
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई सुशोभीकरण अंतर्गत अतिरिक्त 320 कामांचे भूमीपूजन करण्यात आले.  यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला.  ते म्हणाले की, मुबईच्या कायापालट कार्यक्रमाच्या तिसऱ्या टप्प्यात 320 कामाचे भूमिपूजन होत असून ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. मुंबई ही आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका आहे. महानगरपालिकेतील पैसा बँकेत ठेवण्यासाठी नाही. तो जनतेचा पैसा आहे आणि जनतेसाठी वापरा असे निर्देश आयुक्त इकबाल चहल यांना आम्ही दिले आहेत असेही त्यांनी सांगितले.