काही भक्तांना वाटते हे जग आमचे पवारसाहेबच चालवतात; फडणवीसांचा टोला

मुंबई : एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा पाठिंबा मिळाल्याने आपली जागा भक्कम आहे, असे भाजपला वाटत असले तरी ही सर्व खेळी शरद पवारांचीच आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असल्याबाबत देवेंद्र फडणवीस यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. यावर बोलताना, फडणवीसांनी शरद पवारांना जोरदार टोला लगावला.

फडणवीस म्हणाले की, शरद पवारांची एक खासियत आहे. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन अनेक दंतकथा तयार होत असतात. त्या कथा लोकप्रियही होतात. मग काही भक्त असेही आहेत की, जगात जे काही चालते ते शरद पवारच चालवतात, असे त्यांना वाटते. मला शरद पवारांबद्दल आदर आहे. पण काही भक्तांना असे वाटते. त्यामुळे हे जग आमचे पवारसाहेबच चालवतात, अशाप्रकारे बोलले जाते, असा खोचक टोला देवेंद्र फडणवीसांनी लगावला.

२०२४ ची लोकसभा व विधानसभा निवडणुकीवर भाष्य करतांना फडणवीस म्हणाले की, मला असे वाटते की, आता आम्ही तिघे एकत्रित आहोत. अतिशय भक्कपणे एकत्र आहोत. २०२४ ची लोकसभा आणि विधानसभा निवडणूक तिघेही एकत्रित लढू. पुन्हा आम्ही निवडून येऊ. आमच्या जागा आणखी वाढतील. जागा कमी होणार नाहीत. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. अनुभवी नेते आहेत. त्यामुळे आवश्यकता असेल तर अजित पवार त्यांचा सल्ला घेतात. कधी आम्हालाही शरद पवार सल्ला देत असतात, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.