---Advertisement---
तरुण भारत लाईव्ह I मुंबई : अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर विधानसभेत 49 सदस्यांनी आपली मत मांडली होती. यानंतर आज विरोधकांनी केलेल्या घोषणाबाजीवर फडणवीसांनी चांगलाच समाचार घेतला. अर्थसंकल्पावर विरोधी पक्ष नेत्यांना काहीच बोलता आले नसल्याने, विधानसभेतील पायऱ्यांवर बसून इवेंट करायची वेळ आल्याची टीका फडणवीस यांनी केली. तर, हा अर्थसंकल्प सर्व घटकांचा अर्थसंकल्प आहे. असे ही फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांनी सुरूवातीला विधानसभेतून आत येतानाचा किस्सा सांगितला. विरोधी पक्षाचे नेते विधानसभेच्या पायऱ्यावर एक डोंगर घेऊन उभे होते. हा डोंगर उघडायचा आणि त्यातून उंदीर बाहेर यायचा. याचा अर्थ असा की ”खोदा पहाड निकला चुहा”, हा सर्व किस्सा फडणवीस यांनी अॅक्शन करून सांगितला. हा किस्सा सांगून फडणवीसांनी विरोधी पक्षनेत्यावरच टीका केली. ते म्हणाले, “मला इतका आनंद झाला. विधानसभेत अर्थसंकल्पावर दोन दिवस चर्चा झाली, पण महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले की, विरोधी पक्ष नेत्यांना काहीच बोलता आले नाही.” म्हणून विधानसभेच्या पायऱ्यांवर उभं राहून इवेंट करण्याची वेळ विरोधी पक्ष नेत्यांवर आल्याची टीका फडणवीस यांनी केली.
“हा अर्थसंकल्प सर्व घटकांचा अर्थसंकल्प आहे. सर्व समावेश, शेतकऱ्यांचा सन्मान, मातृशक्तीचा गौरव, पायाभूत सुविधांच्या नवा वाटा शोधणारा अर्थसंकल्प असल्याचे फडणवीस यांनी सांगितल आहे.तसेच जे पंचामृत आम्ही मांडलय ते पंचामृत सगळ्यांना मिळाव अशी आमची इच्छा असल्याचे फडणवीस म्हणाले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवसेनेच्या आमदारांना मिळणारा निधी आणि यावेळी शिवसेनेच्या आमदारांना मिळालेला निधी याची टक्केवारीच सादर करत अजित पवार यांना सडेतोड उत्तर दिलं. मविआ सरकारच्या काळात शिवसेना सर्वात मोठा पक्ष असूनही निधी मात्र १५ टक्के दिला गेला होता. यावेळी शिवसेनेच्या सदस्यांना ३४ टक्के निधी मिळाला हे फडणवीसांनी लक्षात आणून दिलं.
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अर्थसंकल्पात भाजपाला आमदारांना ६६ टक्के तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबतच्या आमदारांना ३४ टक्के निधी दिला गेल्याचं विधान केलं होतं. यावर उत्तर देताना फडणवीस यांनी मविआ सरकारच्या काळातील परिस्थितीची आठवण अजित पवारांना करुन दिली. “अजित दादा तुम्ही अगदी बरोबर आकडेवारी सांगितली. पण आता बाळासाहेबांच्या विचारांनी चालल्यानं काय परिणाम होतो हे मी तुम्हाला सांगतो. २०-२१ च्या अर्थसंकल्पामध्ये राष्ट्रवादीला २ लाख ४८ हजार ३८८ कोटी, काँग्रेस १ लाख २१ हजार १४ कोटी आणि सगळ्यात मोठा पक्ष असलेला शिवसेना फक्त ६६ हजार कोटी रुपये. १५ टक्के दादा, १५ टक्के निधी दिला गेला. जेव्हा त्यांचे ५६ आमदार होते तेव्हा फक्त १५ टक्के, आता आमच्यासोबत ४० आमदार आहेत तरीही ३४ टक्के.” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी रामदास आठवले स्टाइल कविताही म्हटली. “आमच्या रामदास आठवले साहेबांच्या शब्दात सांगायचं तर.. तुम्ही केली त्यांची कोंडी म्हणून मारली आम्ही मुसंडी”, असं फडणवीस म्हणाले.
---Advertisement---