---Advertisement---
धुळे : शहरात बनावट नोटांचे मोठ्याप्रमाणात वाढ होतांना दिसून येत आहे. यात ५०० रुपयांच्या नोटांचे प्रमाण अधिक आहे. आज सकाळी धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती ५०० रुपयांची बनावट नोट चलनात आल्याने एकच खळबळ उडाली. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा-बटाटा व्यापार करणाऱ्या विक्रेत्याला बनावट ५०० रुपयांची नोट देण्याचा प्रकार उघड झाला आहे. यात व्यापाऱ्याने जागृतता दाखविल्याने हा प्रकार तात्काळ उघडकीस आला. यात आरोपीला रंगेहाथ पकडण्यात आले, परंतु, गर्दीचा फायदा घेऊन तो पळून जाण्यात यशस्वी ठरला. यामुळे व्यापाऱ्यांत तसेच सामान्य नागरिकांत चिंता व्यक्त होत आहे.
धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत शिंदे बंधूंचे दुकान आहे. दररोज येथे शेतकऱ्यांकडून कांदे-बटाट्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री होत असते. आज सकाळी साधारण ८.३० वाजता एक ग्राहक कांदा-बटाट्यांची खरेदी करण्यासाठी आला. त्याने सचिन शिंदे यांना ५०० रुपयांची नोट दिली. मात्र, सचिन शिंदे हे यापूर्वीही अशाच बनावट नोटांच्या प्रकाराला सामोरे गेले असल्याने त्यांनी नोट बारकाईने तपासली. त्यातून ती नोट बनावट असल्याचे त्वरित लक्षात आले.
सचिन शिंदे यांनी ग्राहकास जाब विचारला असता, त्याच्याकडे आणखी बनावट नोटांचे बंडल असल्याचे दिसून आले. परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून ती व्यक्ती अचानक गर्दीचा फायदा घेत पळून गेला. घटनेची माहिती तातडीने आझाद नगर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी बाजार समितीत दाखल होत सदर बनावट नोट जप्त केली आहे. आरोपीचा शोध सुरू असून, या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.
---Advertisement---
बाजार समितीत घडलेली घटना ही केवळ एक झलक असून, बनावट नोटा मोठ्या प्रमाणावर चलनात आल्या असल्याचे यावरून उघड होत आहे. व्यापाऱ्यांनी पोलिसांना तातडीने काटेकोर तपास करून या रॅकेटमागील सूत्रधारांना गजाआड करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, धुळेकरांनी ५०० रुपयांची नोट घेताना विशेष सतर्कता बाळगावी, नोट तपासूनच स्वीकारावी, असे आवाहन व्यापारी संघटनांकडून करण्यात आले आहे.