भुसावळ : तालुक्यातील साकेगाव येथून बनावट नोटा प्रकरणी अटकेतील दोघा आरोपींना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या गुन्ह्यातील आरोपींचे नाचणखेडा कनेक्शन समोर आले असून आरोपींच्या अटकेसाठी दोन पथके रवाना करण्यात आली आहे. 20 हजारांच्या नोटाप्रकरणी साकेगावातून शहनाज अमीन भोईटे (35, पाण्याच्या टाकीजवळ, साकेगाव) व हनीफ अहमद शरीफ देशमुख (लाखोली, नाचणखेडा, ता.जामनेर) यांना अटक करण्यात आली आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
राष्ट्रीय महामार्गावरील साकेगाव येथे बनावट नोटा मिळत असल्याची गोपनीय माहिती डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांना मिळाल्यानंतर त्यांनी सापळा रचला. तीन हजारांच्या खर्या नोटा घेवून बनावट नोटा घेण्यासाठी डमी ग्राहक पाठवण्यात आल्यानंतर त्यास 15 हजार रुपये देण्यात आले त्यानंतर पंचांसमक्ष पोलिसांनी धाड टाकत एकूण 20 हजारांच्या नोटा जप्त केल्या.
नाचणखेडा लिंक आली समोर
डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, पोलिस निरीक्षक विलास शेंडे यांनी गुरूवारी अत्यंत गोपनीय पध्दतीने साकेगावातून शहनाज अमीन भोईटेच्या घरातून तालुका पोलिसांनी 20 हजार रूपयांची बनावट नोटांची रक्कम जप्त केली. या महिलेच्या माहितीवरून हनीफ अहमद शरीफ देशमुख (लाखोली, नाचणखेडा, ता.जामनेर) यांना अटक करण्यात आली.
दोन पथकांद्वारे अन्य संशयीतांचा शोध
डीवायएसपी वाघचौरे, निरीक्षक शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे दोन पथक अन्य जिल्यात संशयीतांच्या मागावर रवाना करण्यात आले असून अन्य संशयीतांच्या अटकेनंतर छपाईचे साहित्य जप्त केले जाणार आहे.