गुजरात : भरूच शहरात ‘छावा’ सिनेमाच्या प्रदर्शनादरम्यान एक धक्कादायक घटना घडली. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित या चित्रपटातील एक सीन पाहून प्रेक्षकाला इतका संताप आला की त्याने थिएटरमधील स्क्रीनच फाडून टाकली. रविवारी (ता. १६ फेब्रुवारी) रात्री ही घटना घडली असून, पोलिसांनी या प्रकरणी कारवाई केली आहे.
भरूच येथील आरके चित्रपटगृहामध्ये रविवारी रात्री ११.४५ वाजता ‘छावा’ सिनेमाचा शो सुरू होता. चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांमध्ये जयेश वासवा नावाचा एक तरुणही सामील होता. छावा’ सिनेमात १६८९ मध्ये संगमेश्वर येथे औरंगजेबाने कैद केलेल्या संभाजीराजे महाराजांच्या शिरच्छेदाचा सीन दाखवण्यात आला आहे. हा सीन पाहून जयेश वासवाला राग अनावर झाला. संभाजी महाराजांना औरंगजेब मारत असल्याचे पाहून तो स्क्रीनच्या दिशेने धावला. त्याने अग्निशामक यंत्राच्या मदतीने औरंगजेबावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्या या प्रयत्नाने थिएटरमधील स्क्रीन फाटली.
हेही वाचा : वर्गमित्राकडून मानसिक अन् शारीरिक त्रास, इंजिनिअरिंग विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल
जयेश मद्यधुंद अवस्थेत होता. या घटनेनंतर थिएटरमधील कर्मचाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप केला आणि जयेशला बाहेर काढले. आरके सिनेमाचे जनरल मॅनेजर आर. व्ही. सूद यांनी सांगितले की, “ब्लूचिप सिनेमाच्या कर्मचाऱ्यांनी मला तातडीने फोन करून कळवले की एका प्रेक्षकाने अग्निशामक यंत्राच्या मदतीने स्क्रीन फाडली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी त्याला ताबडतोब बाहेर काढण्याचे निर्देश मी दिले आणि पोलिसांना माहिती दिली.”
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेमुळे थिएटरचे जवळपास १.५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. जयेश वासवा याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील चौकशी सुरू आहे.
हेही वाचा : हृदयद्रावक! एकीकडे बारावीचे पेपर अन् इकडे वडिलांचं निधन, चेतनवर कोसळला दुःखाचा डोंगर
या घटनेमुळे सिनेमाचा शो अर्ध्यावरच थांबवावा लागला. त्यामुळे थिएटर व्यवस्थापनाने त्या वेळी उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना शेजारच्या स्क्रीनवर उर्वरित सिनेमा पाहण्याची ऑफर दिली, तर काहींना तिकीटाचे पैसे परत करण्यात आले.
‘छावा’ सिनेमाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट प्रेक्षकांच्या हृदयाला भिडत आहे. विकी कौशल आणि रश्मिका मंदानाने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. मात्र, सिनेमातील काही प्रसंग पाहून प्रेक्षक भावनाविवश होत असल्याचे दिसून येत आहे.
भावनांना वाट द्यावी, पण संयमही आवश्यक!
संभाजी महाराजांच्या जीवनातील घटनांनी अनेक मराठी आणि भारतीय नागरिकांना अभिमानाची जाणीव होते, तसेच काही प्रसंग मन हेलावून टाकणारे आहेत. मात्र, कोणत्याही परिस्थितीत कायदा हातात घेणे योग्य नाही. थिएटरमध्ये घडलेली घटना ही याचेच उदाहरण आहे. या घटनेनंतर ‘छावा’ सिनेमाविषयी चर्चा अधिक रंगू लागली असून, हा प्रसंग लोकांच्या भावनांवर किती परिणाम करत आहे, हे स्पष्ट झाले आहे.