आता टीम इंडियाचं सर्व काही ठीक, चाहत्यांना फक्त रोहितकडून एक अपेक्षा, वाचा काय आहे ?

India vs Afghanistan 3rd T20 : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील T20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना बेंगळुरू येथे आज बुधवारी खेळवला जाणार आहे. बंगळुरू येथे होणाऱ्या या सामन्यासाठी टीम इंडिया पूर्णपणे सज्ज आहे. बंगळुरूच्या हवामानाबद्दल बोलायचे झाले तर बुधवारी पावसाची शक्यता नाही. त्यामुळे सामना वेळेवरच सुरू होईल. अहवालानुसार, बुधवारी संध्याकाळी बेंगळुरूमध्ये सौम्य थंडी असेल. मात्र मोहाली आणि इंदूरच्या सामन्यांमध्ये खेळाडूंना दिलासा मिळणार आहे. दरम्यान, टीम इंडियाचे कर्णधार रोहित शर्मा आज फॉर्मात येणार का, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

पहिल्या दोन सामन्यांत सर्व काही अपेक्षेप्रमाणे घडलेले आहे. अपवाद आहे रोहितच्या बॅटमधून धावांचा धडाका सुरू होण्याचा. विराट कोहली पहिल्या सामन्यात खेळला नव्हता; परंतु दुसऱ्या सामन्यात त्याने १६ चेंडूत २९ धावांची खेळी साकार केली होती. उद्या त्याचे लक्ष्य मोठ्या खेळीकडे असेल. त्यातच तो त्याच्या आयपीएलमधील घरच्या मैदानावर खेळणार आहे.

रोहित शर्मा फॉर्मात नसला, तरी भारतीय संघाला फलंदाजीची चिंता नाही; मात्र गोलंदाजीत सुधारणा करणे आवश्यक आहे. अफगाणिस्तानचे पहिल्या सामन्यात १५८; तर दुसऱ्या सामन्यात १७२ धावा फटकावल्या होत्या. त्यामुळे उद्याच्या सामन्यात अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी केली, तर त्यांना दीडशे धावांच्या आता रोखण्याचे लक्ष भारतीय गोलंदाजांना बाळगावे लागेल.

अक्षर पटेलने चांगली गोलंदाजी केली. दुसऱ्या सामन्यात तर ४ षटकांत १७ धावां देत २ विकेट मिळवल्या. त्यामुळे तो सामन्यात सर्वोत्तम ठरला होता. त्याच्यासोबत वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगही विकेट मिळवत आहे, मात्र मुकेश कुमारकडून अधिक धावा दिल्या जात आहेत. निवड समिती शिवम दुबेकडे आता वेगळ्या जबाबदारीतून पाहत आहे.

दुबेने फलंदाजीतील आपली गुणवत्ता सिद्ध केलीच आहे; पण त्याच्याकडून गोलंदाजीची अपेक्षा आहे. दोन्ही सामन्यात त्याने एकेक विकेट मिळवून गोलंदाज म्हणून आपली क्षमता दाखवून दिली आहे; परंतु पूर्ण चार षटके गोलंदाजी करण्याची त्याच्याकडून अपेक्षा आहे.