---Advertisement---
जळगाव : चाळीसगाव तालुक्यात खंडणीसाठी टाकळी प्र.चा. येथील १६ वर्षीय मुलाचे अपहरण करण्यात आले. पोलिसांकडे मुलगा हरविल्याची तक्रार देऊन देखील त्यांनी प्रथम याची दखल घेतली नाही. यामुळे या मुलाच्या कुटुंबीयांनी थेट प्रत्नधिकारी प्रमोद हिले यांच्याकडे आपले गाऱ्हाणे मांडले. प्रांताधिकाऱ्यानी सर्च वॉरंट जारी केले. या कारवाईत मुलाची सुखरूप सुटका करण्यात आली. राज्यात या कायद्याचा अशा प्रकारे पहिलाच वापर झाल्याचा दावा केला जात आहे.
चाळीसगाव तालुक्यातील टाकळी प्र.चा. येथील १६ वर्षीय मुलाचे अपहरण करून चार लाखांची खंडणी मागण्यात आली. मुलाला अमली पदार्थ पाजून मारहाण करण्यात आली. टाकळी प्र.चा. येथील विधवा शेतमजूर शोभाबाई कोळी ऊसतोडणीसाठी जात असतात.
दि. १ सप्टेंबर रोजी सकाळी मुकादम परभत गायकवाड (रा. हिसवाळ, ता. मालेगाव) व दीपक भगत (रा. बारामती, पुणे) यांनी त्यांच्या घरी जाऊन मुलगा मयूरला कामासाठी घेऊन जाण्याचे सांगून वाहनात बसविले. मात्र तो घरी परतला नाही. सायंकाळी आईला आरोपींकडून फोन आला आणि चार लाख रुपये न दिल्यास मुलाला कर्नाटकमध्ये विकू वा त्याचे हातपाय तोडू अशी धमकी देण्यात आली.
घाबरलेल्या शोभाबाईंनी शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली. मात्र सुरुवातीला गुन्हा नोंदविण्यात टाळाटाळ करण्यात आली. दोन दिवसांनंतरही कारवाई न झाल्याने त्यांनी वकिलांचा सल्ला घेतला. दरम्यान, आरोपींनी मयूरला अमली पदार्थ व दारू जबरदस्तीने पाजून मारहाण केली होती. वैद्यकीय तपासणीत हे स्पष्ट झाले.
---Advertisement---
नंतर आरोपींनी आपल्या सहकाऱ्यांमार्फत मुलाला बिलाखेड येथे आणून सोडले. शोभाबाई नातेवाईकांसह तेथे पोहोचल्या असता आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न केला असता हवालदार प्रशांत पाटील, सुनील खैरनार, दत्तू साळवे व अशोक मोरे यांनी त्या दोघांना पकडले. मुख्य आरोपी परभत गायकवाड व दीपक भगत मात्र फरार झाले आहेत.
दरम्यान, अॅड. प्रेम निकम व रिकेश गंगेले यांनी प्रांताधिकारी प्रमोद हिले यांच्याकडे अर्ज दाखल केला. हिले यांनी तत्काळ ‘सर्च वॉरंट’ जारी करून चाळीसगाव पोलिसांना आदेश दिले. पोलिस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांच्या मार्गदर्शनाखाली शोधमोहीम राबविण्यात येऊन मुलाची सुटका करण्यात यश आले.