CM Eknath Shinde । महायुतीचं सरकार हे सर्वसामान्यांचं असून राज्याच्या तिजोरीवर पहिला अधिकार शेतकऱ्यांचा आहे. त्यामुळे गेल्या अडीच वर्षांत अनेक निर्णय घेतले. ‘एक रुपयात पीकविमा, मोफत वीज, नमो शेतकरी महासन्मान, सरकार आपल्या दारी, मुख्यंमत्री लाडकी बहीण’, अशा अनेक योजना राबवून सर्वसामान्यांसाठी काम केलं. मुख्यंमत्री लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याचं विरोधक म्हणत आहेत परंतु, मी तुम्हाला शब्द देतो की ही योजना कायमस्वरूपी राहणार आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
मुक्ताईनगर येथे आयोजित महायुतीच्या मेळ्यात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार सुरेश भोळे, आमदार किशोर आप्पा पाटील, आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
काँग्रेसचा माणूस नागपूर खंडपीठात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना थांबवण्यासाठी गेला. परंतु कोर्टाने त्याची याचिका भेटाळून लावली. लाडक्या बहिणींच्या बाजूनेच कोर्टाने निकाल दिला. त्यामुळे सर्व सामान्य लाडक्या बहिणीच्या कुटुंबाला आधार मिळाला आहे. मुख्यंमत्री लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याचं विरोधक म्हणत आहेत परंतु, मी तुम्हाला शब्द देतो की ही योजना बंद होणार नसून कायमस्वरूपी राहणार आहे. सर्व लाडक्या बहिणींना लखपती झालेल्या बघायचं आहे, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
नमो शेतकरी महासन्मान योजना, एक रुपया पिक विमा योजना, मोफत वीज, सरकार आपल्या दारी योजना, तीर्थ दर्शन योजना, अशा अनेक योजना राबवून सर्वसामान्यांसाठी काम केलं. महायुतीचं सरकार हे सर्वसामान्यांचं असून राज्याच्या तिजोरीवर पहिला अधिकार शेतकऱ्यांचा आहे. देशातलं पहिलं राज्य आहे जे वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. हे देणार सरकार आहे. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू आता सरकली आहे. त्यांचं विरोधकांच्या छातीत भरली धडकी, अशा प्रकारचं काम सुरू झालेलं आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
सरकार सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं काम करतोय. राज्यभर प्रकल्प जे महाविकास आघाडीने बंद केले होते ते प्रकल्प सुरू केले. उद्योग आणले, उद्योगांना वाढ दिली, चालना दिली, असे विविध काम आमच्या सरकारने केलं. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या कामाची तुलना करा दूध का दूध, पाणी का पाणी होऊन जाईल, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदारांना महायुतीला पाठिंबा देण्याचे आवाहन केले.
शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई
राज्यातील अनेक भागात अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे. हे सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणारं नसून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणार आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
चंद्रकांत पाटलांची उमेदवारी निश्चित
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या विकास कामांचे कौतुक करत २३ तारखेला त्यांच्या विजयाचे फटाके फुटतील, असा विश्वास व्यक्त केला. यातूनच त्यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांची उमेदवारी जाहीर केली.