मोठी बातमी! मुंबईत धडकण्यापूर्वीच शेतकर्‍यांचा मोर्चा मागे

मुंबई – विविध मागण्यांसाठी नाशिकहून निघालेला शेतकर्‍यांचा मोर्चा मागे घेत असल्याची घोषणा माजी आमदार जेपी गावित यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेतून शेतकर्‍यांना सरकारकडून सकारात्मक पाऊल उचलण्याचं आश्वासन दिले. त्यानंतर तातडीने सरकारकडून पाऊले उचलल्यामुळे शेतकर्‍यांनी लाँग मार्च मागे घेण्याची घोषणा केली आहे.

या मोर्चाचं नेतृत्व करणारे नेते जेपी गावित म्हणाले की, याआधी जितके मोर्चे आले त्यात एखादा मंत्री येतो आश्वासन देत होते. परंतु विधानसभेत आमच्या मागण्यांबद्दल सरकारला निवेदन द्यावे लागले. प्रश्न सोडवण्यासाठी सरकारकडून तात्काळ उपाययोजना केल्या जातील अशी विनंती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी आम्हाला केली. अनेकदा मोर्चावेळी मागणी मान्य होतात पुढे काहीच घडत नाही. निवेदन पटलावर वाचून दाखवतात. पटलावर निवेदन देतात पण कार्यवाही होत नाही. त्यामुळे तुमच्यावर विश्वास नाही असं आम्ही म्हटलं. त्यामुळे निवेदन दिल्यानंतर दुसर्‍याच दिवशी कार्यवाही सुरू झाली असे लोकांचे फोन आम्हाला यायला हवेत असं त्यांनी सांगितले.

त्याप्रमाणे एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार आता तोडगा निघत आहे. नाशिक जिल्ह्यातील अनेक अधिकारी कार्यवाहीच्या कामाला लागले आहेत. प्रश्न समजून घेऊन अधिकारी तातडीने कारवाई करत आहे. याआधी मोर्चे निघाले परंतु सरकारने तात्काळ दखल घेऊन कार्यवाहीला सुरूवात झाली. सरकारी आदेशाचे अंमलबजावणी सुरू आहे ही खात्री झाल्यावर आज आम्ही शेतकरी लाँग मार्च मागे घेतोय अशी घोषणा माजी आमदार जेपी गावित यांनी केली.