पुन्हा शेतकरी आंदोलन, दिल्लीच्या सर्व सीमा सील

नवी दिल्ली : शेतकरी संघटनांच्या ‘चलो दिल्ली’ मोर्चाबाबत हरयाणा आणि दिल्लीतील पोलीस हाय अलर्टवर आहेत. शेतकरी आंदोलनच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी होणारा मोर्चा रोखण्यासाठी पोलिसांनी सिंघू आणि गाझीपूरसह दिल्लीच्या सर्व सीमा सील केल्या आहेत. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी काटेरी तारा आणि काँक्रीट बॅरिकेड्स लावून सीमा सील करण्यात आली आहे. हरियाणातील 7 जिल्ह्यांमध्ये इंटरनेट बंद करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार पंजाबमधून शेतकरी दिल्लीला रवाना झाले आहेत. शेतकरी मोठ्या संख्येने ट्रॅक्टर आणि ट्रॉलीने दिल्लीला जात आहेत. या शेतकऱ्यांना हरियाणातच रोखण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.

दिल्लीच्या सर्व सीमांवर कलम 144 लागू करण्यात आले आहे. याशिवाय चंदीगडमध्ये दोन महिन्यांसाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. हरियाणात अंबाला, सिरसा, रोहतक, सोनीपत, झज्जर, जिंद, कुरुक्षेत्र, कैथल, हिसार, फतेहाबाद, भिवानी आणि पंचकुला याठिकाणी कलम 144 लागू करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हरियाणातील दोन स्टेडियमचे तात्पुरत्या तुरुंगात रूपांतर करण्यात आले आहे. अंबालाजवळील शंभू सीमेवर पंजाबची सीमा सील करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हरियाणात फतेहाबाद, सिरसा, अंबाला, कुरुक्षेत्र, कैथल, जिंद, हिसार आणि डबवली येथे इंटरनेट बंद करण्यात आले आहे.

काय आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या?
MSP साठी कायदेशीर हमी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी, शेतकरी कर्जमाफी, शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेणे, लखीमपूर खेरी हिंसाचारातील पीडितांना न्याय, या शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. त्यामुळे हरयाणा, पंजाब आणि उत्तर प्रदेशातील अनेक शेतकरी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. शेतकरी संघटनांच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारने त्यांना आज (१२ फेब्रुवारीला) दुसऱ्या बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे.