शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतले; या कारणामुळे दूध उत्पादक संतापले

सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील विविध गावातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी रविवारी कोंडी येथे रास्ता रोको आंदोलन केले. राष्ट्रीय महामार्ग रोखल्याने वाहनांच्या रांगा सुमारे एक किलोमीटरपर्यंत लागल्या होत्या. यावेळी निषेध म्हणून दूध उत्पादक शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतून सरकारचा निषेध केला. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदालनामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.

राज्यातील खासगी व सहकारी संघांनी गाईच्या दूध खरेदी दरात सुरू केलेली कपात तत्काळ रद्द करावी. गाईच्या दुधाला शासनाने जाहीर केलेला हमी दर द्यावा, राज्यातील दूध व्यवसाय हा खासगी संघांच्या ताब्यात गेला असून त्यांच्या नफेखोर धोरणामुळे शेतकरी लुटला जात आहे. सरकारचे कुठलेही नियंत्रण त्यांच्यावर नाही. त्याचबरोबर दूध उत्पादकाला न्याय द्यावा अशी ही भूमिका सरकारची दिसत नाही. शासनाने दुधाला रास्त भाव देण्यासाठी तत्काळ कायदा करावा, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.

यावेळी शेतकऱ्यांनी राज्यात खासगी व सहकारी संघाकडून साखळी करून दूध उत्पादकाला लुटले जात असल्याचा आरोप केला. त्यानंतर शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतून शासनाच्या धोरणाचा निषेध केला. यावेळी उ. सोलापूर तालुक्यातील बीबीदारफळ कळमण, रानमसले, मिरज परिसरातील दूध उत्पादक आंदोलनाला उपस्थित होते. आंदोलनाच्या वेळी सोलापूर पोलिस स्थानकाच्या वतीने बंदोबस्त ठेवण्यात आला होता.