धुळ्यात भर पावसात शेतकरी उतरले रस्त्यावर; काय आहेत मागण्या ?

धुळे : अक्कलपाडा धरणातून पाणी सोडण्यावरून भर पावसात शेतकऱ्यांनी धुळे- साक्री महामार्गावर नेर परिसरात रास्ता रोको आंदोलन केले आहे. अक्कलपाडा उजवा-डावा शेती पाणी हक्क संघर्ष समितीच्यावतीने हा रास्ता रोको करण्यात आला.

अक्कलपाडा धरण पुर्ण १०० टक्के क्षमतेने भरण्यात यावे, त्यासंदर्भात प्रस्ताव शासनाकडे सादर करावा, अक्कलपाडा धरणाच्या सध्याच्या ६० टक्के पाणीसाठ्या प्रमाणे धुळे शहराला नियमाप्रमाणे ३०० एमसीएफटी पाणी देण्यात यावे, मंजूर प्रकल्प अहवालाप्रमाणे सैय्यदनगर बंधाऱ्यावरील भदाणेपासून चौगाव पर्यंतच्या ९६०० एकर शेतीला लाटीपाडा धरणातून पूर्वीप्रमाणे पाणी मिळावे, यासह आणखी विविध मागण्यासाठी हा रस्ता रोको यावेळी करण्यात आला आहे.

धुळे- साक्री महामार्गावर काण्यात आलेल्या या रास्ता रोको आंदोलनमध्ये शेकडो शेतकरी व नागरिक सहभागी झाल्याचे बघावयास मिळाले. यावेळी प्रशासनाच्या विरोधामध्ये घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे.

दरम्यान या रास्ता रोको आंदोलनामुळे वाहतुकीचा देखील मोठ्या प्रमाणात खोळंबा झाला होता. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्याचे बघावयास मिळाले आहे.