शेतकर्‍यांना केंद्राप्रमाणेच वर्षाला ६ हजार रुपये मिळणार; फडणवीसांची घोषणा

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकर्‍यांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये राज्य सरकारकडून केंद्राच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान योजना जाहीर करण्यात आली आहे. तसेच शेतीसाठी विविथध योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. नव्या घोषणेनुसार, महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना आता एकूण १२,००० रुपयांचा सन्माननिधी मिळणार आहे. केंद्र सरकारच्या ६ हजारांच्या मदतीला राज्य सरकार आणखी सहा हजार रुपये देणार आहे. आमच्या पहिल्या सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी योजना पुन्हा चालू केली जाणार आहे. मधल्या काळात ज्या शेतकर्‍यांना लाभ मिळाले नाहीत त्या शेतकर्‍यांना याचे लाभ दिले जाणार, असल्याचे फडणवीस म्हणाले.

मागेल त्याला शेततळे योजनेचा विस्तार करण्यात येत आहे. मागेल त्याला फळबाग, ठिबक, हरितगृह आदींसाठी १००० कोटींचा निधी देण्यात येणार आहे. कोकणात काजू, बोंडू प्रक्रिया केंद्र उभारणार असल्याचे फडणवीस म्हणाले. काजू फळ विकास योजना आजरा आणि चंदगडमध्ये योजना राबविण्यात येणार आहे. तसेच अपघातग्रस्त शेतकर्‍याच्या कुटुंबास दोन लाखांपर्यंत सानुग्रह अनुदान दिले जाईल, असेही फडणवीस म्हणाले.

शेती व शेतकर्‍यांसाठी मोठ्या घोषणा

महाराष्ट्रातील शेतकर्‍यांसाठी महाकृषिविकास अभियान
राज्यातील शेतकर्यांच्या उत्पन्नवाढीसाठी महाकृषिविकास अभियान राबविणार
पीक, फळपीक घटकाच्या उत्पादनापासून ते मूल्यवर्धनापर्यंत
तालुका, जिल्हानिहाय शेतकरी गट, समूहांसाठी योजना
एकात्मिक पीक आधारित प्रकल्प आराखडा तयार करणार
५ वर्षांत ३००० कोटी रुपये उपलब्ध करून देणार
शेतमाल विक्रीसाठी आलेल्या, शेतकर्यांना निवारा-भोजन
कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी येणार्या शेतकर्यांना सुविधा
शेतकर्यांच्या मुक्कामासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन
जेवणासाठी शिवभोजन थाळीची उपलब्धता
शेतकर्‍याना अन्नधान्याऐवजी, थेट रोखीने आर्थिक मदत
विदर्भ, मराठवाड्यातील १४ आपत्तीग्रस्त जिल्ह्यांना केशरी शिधापत्रिकाधारकांना थेट आर्थिक मदत
अन्नधान्याऐवजी रोख रक्कम थेट आधार बँक खात्यात
प्रतिवर्ष, प्रतिशेतकरी १८०० रुपये देणार
नागपुरात कृषी सविधा केंद्र,विदर्भात संत्राप्रक्रिया केंद्र
नागपुरात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्र स्थापन करणार
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रसार हा उद्देश
या केंद्रासाठी २२८ कोटी रुपये देणार
नागपूर जिल्ह्यातील नागपूर, काटोल, कळमेश्वर, अमरावती जिल्ह्यात मोर्शी, बुलढाणा जिल्ह्यात आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्र /२० कोटी रुपये तरतूद
नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन, ३ वर्षात १ हजार कोटी निधी
नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणार
३ वर्षांत २५ लाख हेक्टर क्षेत्र सेंद्रीय शेतीखाली आणणार
१००० जैवनिविष्ठा स्त्रोत केंद्र स्थापन करणार
डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनची व्याप्तीवाढ
३ वर्षांत १००० कोटी रुपये निधी