---Advertisement---
धुळे : शिरपूर तालुक्यात समाधानकारक पाऊस होऊन खरीप हंगामाची सुरुवात झाली असली तरी, शेतकऱ्यांना खतांच्या तीव्र तुटवड्याचा सामना करावा लागत आहे.
मका, कापूस, ज्वारी, मूग, केळी, पपई, ऊस यासारख्या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड झाली असताना, युरिया, डीएपी, १०:२६:२६ या प्रमुख खतांची बाजारात टंचाई जाणवत आहे. मशागतीची कामे वेगाने सुरू असूनही, खतांच्या उपलब्धतेअभावी शेतकरी चिंतेत आहेत.
ही समस्या प्रशासनाच्या निदर्शनास आणण्यासाठी शिरपूर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतेच तहसीलदारांना निवेदन दिले. या निवेदनात, तालुक्यात युरिया खताची जास्त मागणी असूनही, ते ठराविक लोकांनाच दिले जात असल्याची तक्रार करण्यात आली आहे.
खत वाटपातील गैरव्यवहाराच्या तक्रारी
काही व्यापाऱ्यांकडून खतांची जादा दराने विक्री केली जात असून, युरियासोबत इतर खतांची सक्ती केली जात असल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष घालून खते लवकर उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी अरुण धोबी, किशोर माळी, संजय आसापुरे, राधेश्याम भोई, रवींद्र भोई, मुबीन शेख, संजय पाटील, अनिल बोरसे आदी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.