---Advertisement---
नशिराबाद, प्रतिनिधी : नशिराबाद टोल नाक्यावर बसचा टायर फुटून भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात एक महिला जागीच ठार झाली असून, या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर आगाराची बस जळगावकडून भुसावळकडे जात होती. दरम्यान, नशिराबाद टोल नाक्यावर बसचा टायर फुटून भीषण अपघात झाला. बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस थेट टोल नाक्याजवळील एका भिंतीवर जाऊन आदळली.
या अपघाताच्या धक्क्याने बसमधील प्रवासी महिला खिडकीतून बाहेर फेकली गेली. बसच्या मागील चाकाखाली आल्याने तिचा चिरडून जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, घटनास्थळी स्थानिक लोकांनी धाव घेत मदतकार्य सुरू केले आहे.
अपघाताची माहिती मिळताच नशिराबाद पोलीस ठाण्याचे कर्मचारी देखील त्वरित घटनास्थळी दाखल झाले असून, वाहतूक सुरळीत करण्यासाठी तातडीने कारवाई सुरु केली आहे.
मयत महिला साराबाई भोई ह्या डोळे तपासण्यासाठी जळगाव शहरात आल्या होत्या. डोळे तपासणी केल्यानंतर त्या घरी पाडळसा येथे घरी जात होत्या. त्यांच्या पश्चात पती व तीन मुले असा परिवार आहे.









