नालासोपारा : मुंबईपासून काही अंतरावर असलेल्या नालासोपाऱ्यात बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नराधम पित्याने पोटच्या तीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. पीडित मुलींनी नालासोपारा पोलीस ठाण्यात धैर्याने तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकाराचा पर्दाफाश झाला. सदर आरोपीवर खंडणी, गोळीबार तसेच हत्येसारख्या गंभीर गुन्ह्यांचे आरोप आधीच दाखल आहेत. सध्या तो फरार असून पोलिसांनी त्याच्या शोधासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
पीडित मुली मूळच्या कोकणातील रहिवासी असून त्या पाच बहिणी आहेत. त्यांचा 56 वर्षीय पिता एक कुख्यात गुन्हेगार आहे. कोकणात असतानाच तो सतत आपल्या मुलींवर जबरदस्ती करत असे. यातून एका मुलीला चार वेळा गर्भपात करावा लागला होता. अखेर पित्याच्या अमानुष अत्याचाराला कंटाळून आई पाचही मुलींना घेऊन नालासोपारा येथे एका नातेवाईकाच्या घरी राहायला आली.
हेही वाचा : अनैतिक संबंध : नवऱ्याचा काटा काढण्याचं ठरवलं अन् प्रियकरालाही गमावून बसली महिला, नेमकं काय घडलं?
या तिघी बहिणींपैकी मोठी मुलगी 21 वर्षांची असून इतर दोघी अल्पवयीन आहेत. वडिलांकडून होत असलेल्या अत्याचाराविरोधात तक्रार दाखल करण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला. आतापर्यंत वडिलांच्या दहशतीमुळे या मुली गप्प बसल्या होत्या. मात्र, अखेर मोठ्या मुलीने पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली.
तक्रारीच्या आधारे नालासोपारा पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीविरुद्ध लैंगिक अत्याचार आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी हा आधीपासूनच अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये वांछित असून त्याच्यावर खंडणी, गोळीबार आणि हत्येचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या अटकेसाठी विशेष पथक तैनात केले आहे.
या अमानुष घटनेमुळे नालासोपारा आणि परिसरात संतापाची लाट उसळली आहे. एका पित्यानेच आपल्या मुलींवर असा विकृत अत्याचार केल्याने नागरिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. आरोपीवर कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे. आता पोलीस या प्रकरणात काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.