धक्कादायक ! मोबाईलसाठी मुलाचा हट्ट; मुलाच्या आत्महत्येनंतर वडिलांनीही उचललं टोकाचं पाऊल

नांदेड : बिलोली तालुक्यातील मिनकी गावात एकाच कुटुंबातील पिता-पुत्राने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मोबाईलसाठी मुलाचा हट्ट व वडिलांचे नकार यामुळे निर्माण झालेल्या वादळात दोघांनीही आपले जीवन संपवल्याने संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजू लक्ष्मण पैलवार हे मिनकी येथील मध्यमवर्गीय कुटुंबप्रमुख आपल्या पत्नी व तीन मुलांसोबत राहत होते. त्यांचा १७ वर्षीय मुलगा ओमकार हा अकरावीमध्ये शिकत होता. काही दिवसांपासून ओमकार अभ्यासासाठी मोबाईल घेऊन देण्याची मागणी करत होता. मात्र, आर्थिक परिस्थितीमुळे राजू पैलवार यांना मोबाईल घेऊन देणे शक्य झाले नाही.

बुधवारी रात्री, घरगुती वाद झाला. त्यावेळी ओमकारने पुन्हा मोबाईलची मागणी केली, परंतु वडिलांनी याला नकार दिला. याच रागातून ओमकारने शेतात जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना पाहून मुलाच्या मृत्यूचा धक्का सहन न होऊन राजू पैलवार यांनीही त्याच ठिकाणी गळफास घेऊन आयुष्य संपवले.

पैलवार कुटुंबातील या दुहेरी आत्महत्येने गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. बिलोली पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.