---Advertisement---

Soygaon News : दुर्दैवी! अज्ञात वाहनाच्या धडकेत बाप-लेकीचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी

---Advertisement---

सोयगाव : भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या जबर धडकेत बाप-लेकीचा जागीच मृत्यू तर दुसरी मुलगी गंभीर जखमी झाली. ही दुर्दैवी घटना सोमवार, २१ रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास जरंडी गावाजवळ सोयगाव-बनोटी रस्त्यावर घडली. धक्कादायक म्हणजे, या अपघातात दुचाकीस्वार पित्याला तब्बल पन्नास फूट फरफटत नेले. अपघाताची माहिती मिळताच निंबायती व जरंडी येथील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले.

अजय रघुनाथ राठोड (वय ३२ रा.न्हावीतांडा), वैशाली अजय राठोड (वय ८) असे मृत बाप-लेकीचे नाव आहे तर काजल अजय राठोड (वय.१०) ही गंभीर जखमी झाली आहे. हे तिघेही जरंडी येथून निंबायती (न्हावीतांडा) येथे दुचाकी (क्र-एम एच-१९ ए.बी.-३७१८) ने जात होते. सोयगाव-बनोटी रस्त्यावर जरंडी गावाजवळ मागून येणाऱ्या भरधाव अज्ञात वाहनाने त्यांना उडविले. या अपघातात बाप-लेकीचा जागीच मृत्यू तर दुसरी मुलगी गंभीर जखमी झाली. तिला तातडीने उपचारासाठी जळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच निंबायती व जरंडी येथील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेवुन मदतकार्य केले. भरधाव अज्ञात वाहनधारकाने वाहनासह घटनास्थळवरून पळ काढला होता निंबायती येथील पोलीस पाटील मूलचंद राठोड,भागचंद चव्हाण,राजू पाटील,गजानन राठोड,पारस राठोड,बबलू राठोड,नाना सुस्ते,जरंडीचे माजी सरपंच समाधान तायडे, माजी उपसरपंच सुनील पवार आदींनी घटनास्थळवरून जखमी मुलगी काजल राठोड हिस जरंडी प्राथमिक आरोग्य केंद्रात तातडीने उपचारासाठी दाखल करून दोन्ही अपघातात मृत झालेल्याचे मृतदेह शवविच्छेदन साठी सोयगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविले होते.

अजय राठोड यांच्या पश्चात वडील,पत्नी,भाऊ,एक मुलगा,एक मुलगी असा परिवार आहे. याप्रकरणी सोयगाव पोलीसांनी घटनास्थळी पंचनामा करून रात्री अज्ञात वाहनधारकाविरुद्ध गुन्ह्याची नोंद केला असून पुढील तपास सोयगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज बारवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गजानन आरेकर,राजू बरडे,रवींद्र तायडे,सादीक तडवी करीत आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment