नंदुरबार : सुनेसोबत असलेल्या अनैतिक संबंधात अडसर येणाऱ्या मुलाचा गळा दाबून खून केल्याची घटना मंडारा, ता. अक्कलकुवा येथे घडली. याबाबत मयत मुलाचा बाप आणि पत्नीविरुद्ध अक्कलकुवा पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुकलाल ईश्वर वसावे (३२, रा. मंडारा) असे मयताचे नाव आहे. गुन्हा दाखल झालेल्या संशयितांमध्ये ईश्वर दिल्या वसावे व मयताची पत्नी यांचा
समावेश आहे.
पोलिस सूत्रांनुसार, सुकलाल याची पत्नी व सुकलालचा बाप यांच्यात अनैतिक संबंध होते. या संबंधांना सुकलाल अडसर येत असल्याने त्याचा काटा काढण्याचे दोघांनी ठरविले. २४ मार्च रोजी घरात कुणी नसताना दोघांनी सुकलाल याचा गळा दाबून खून केला. त्यानंतर गावातील लोकांना व नातेवाइकांना त्याच्या छातीत दुखत असल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
याबाबत मयताच्या आईने फिर्याद दिल्याने दोघांविरुद्ध अक्कलकुवा पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक योगेश चौधरी करीत आहेत.