---Advertisement---
यावल : यावल शहर हादरवून सोडणारी एक भीषण घटना बाबूजीपुरा भागात उघडकीस आली आहे. मोहम्मद हन्नान खान मजीद खान (वय ६ वर्षे) हा बालक शुक्रवारी सायंकाळपासून बेपत्ता होता. शनिवारी सकाळी त्याचा मृतदेह शेजारी राहणाऱ्या तरुणानेच केलेल्या हत्येनंतर घरातील कोठीत लपवून ठेवलेला असल्याचे उघड झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, बेपत्ता बालकाच्या शेजारील रहिवासी बिस्मिल्ला खलिफा दस्तगीर खलिफा यांनी यावल पोलिस ठाण्यात धाव घेत आपल्या मुलगा शेख शाहिद शेख बिस्मिल्ला खलिफा (वय २२) यानेच बालकाची हत्या केली असल्याची माहिती दिली. शाहिदने बालकाचा खून करून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला व तो घरातील कोठीत लपवून ठेवला होता. पोलिस पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठवला.
फॉरेन्सिक पथकाच्या उपस्थितीत शवविच्छेदन करण्यात आले. डॉ. तुषार सोनवणे यांनी वैद्यकीय तपासणी केली. दरम्यान, या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच परिसरात प्रचंड जमाव जमला. जमावाला शांत करण्यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, डीवायएसपी अनिल बडगुजर, पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबडे यांच्यासह मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मुस्लिम समाजातील मान्यवरांनीही पुढाकार घेऊन जमाव शांत केला.
या घटनेनंतर यावल शहरातील व्यापाऱ्यांनी खबरदारी म्हणून आपापली दुकाने बंद ठेवली. जिल्हा मुस्लिम पंच कमिटी, जळगाव जिल्हा एकता मंच यांच्यासह अनेक मान्यवरांनी अप्पर पोलीस अधीक्षकांकडे निवेदन देत, गुन्ह्याचा तपास एसआयटीमार्फत करून महिन्याभरात दोषारोपपत्र दाखल करण्याची मागणी केली आहे.
शनिवारी सायंकाळी शवविच्छेदन झाल्यानंतर रात्री उशिरा बालकावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे यावल शहरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.