मनोज माळी
तळोदा : तालुक्यातील विविध परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. आतापर्यंत बिबट्याने चार जणांचा बळी घेतला असून, याचा परिणाम आता शेती व्यवसायावर झाला आहे. बिबट्याच्या भीतीमुळे शेतमजूर कामावर यायला तयार नाहीत. अशा परिस्थितीत कापूस वेचणी सुरू झाल्याने शेतकतरी मोठया संकटात सापडला आहे.
तळोदा तालुक्यात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे बिबट्यांचा वावर कायमच या भागात असतो. शेतमजूर, महिलांवर बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना यापूर्वी घडल्या असून, आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. परिणामी या भागात बिबट्याची भीती निर्माण झाली आहे.
आता कापूस वेचणी सुरू झाली असल्याने शेतकऱ्यांना मजुरांची गरज भासणार आहे. मात्र, बिबट्याच्या भीतीमुळे शेतमजूर कामावर यायला तयार नाहीत. शिवाय, शेतमजूर मिळाले तरी शेत मालकाने शेतातच थांबावे, असे सांगण्यात येत आहे. अश्या दुहेरी संकटा सापडलेले शेतकरी शेतात थांबून आपले शेती काम करीत असल्याचे चित्र सध्यातरी दिसत आहे.
बिबट्याला हाकलून लावण्यासाठी डफ वाजविणे, फटाके फोडणे आदींच्या वापर शेतकरी सध्या करीत आहे. तरी देखील शेतमजूर कामावर येण्यास ना खुश असतात. यामुळे शेतकऱ्यांना ज्यादा मजुरी देऊन तसेच फटाके व इतर साहित्य खरेदीसाठी अधिकचा खर्च होत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक भूदंड सोसावा लागत आहे.
असेच एक चित्र आग्यावड शिवारात दिलीप होळकर यांच्या शेतात बिबटयाच्या दहशतीत कापूस वेचणी करत असताना एक डफ वाजवणा सतत डफ वाजवत शेतात फिरत आहे, शेतमजुर कापूस वेचणी करत आहेत.