---Advertisement---
सोलापूर : आयपीएस अधिकारी डीएसपी अंजली कृष्णा ह्या वाळूची अवैध उत्खननाच्या तक्रारीसंदर्भांत कारवाई करण्यासाठी पोहचल्या होत्या. याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांने थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन लावून कारवाई थांबविण्याची विनंती केली. यावेळी डीएसपी अंजली कृष्णा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात फोन आणि व्हिडिओ कॉलवरून जोरदार खडाजंगी झाली.
डीएसपी अंजली कृष्णा ह्या माढा तालुक्यातील कुर्डू गावात पोहोचल्या होत्या. यावेळी ग्रामस्थ आणि घटनास्थळी असलेल्या अधिकाऱ्यामध्ये वाद उफाळून आला. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते बाबा जगताप यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थेट फोन करून डीएसपी अंजली कृष्णा यांना फोन दिला. यावेळी फोनवर अजित पवार यांनी स्वतःची ओळख ‘डीसीएम अजित पवार’ अशी करूनदेत कारवाई थांबवण्याचे आदेश दिले.
परंतु, डीएसपी अंजली कृष्णा यांनी त्यांना ओळखण्यास नकार देत थेट त्यांच्या फोनवर फोन करावा असे उलट उत्तर दिले. यावर अजित पवार यांचा राग अनावर झाला. अजित पवार म्हणाले की “मी तुमच्यावर कारवाई करेन, तुमच्यात इतकी हिंमत आहे का? तुम्ही माझा चेहरा ओळखाल ना!” यानंतर अजित पवारांनी थेट व्हिडिओ कॉल केला.
व्हिडिओ कॉल दरम्यान, अजित पवारांनी अधिकाऱ्याला कारवाई थांबवून तहसीलदारांशी बोलण्याचे निर्देश दिले. हा सर्व गोंधळ जवळपास ३ तास चालला. डीएसपी व उपमुख्यमंत्री यांच्यातील संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
ग्रामस्थांनी सांगितले की, ग्रामपंचायतीच्या परवानगी घेऊन उत्खनन करण्यात येत होते परंतु , कोणतेही अधिकृत कागदपत्रे सादर करता आली नाहीत. अशा परिस्थितीत महिला आयपीएस अधिकाऱ्याने कारवाई सुरू केली. अजित पवार यांना फोन करून कार्यकर्त्यांनी हा संघर्ष निर्माण केल्याचे सांगितले जात आहे. सध्या या प्रकरणात पोलिसांकडे कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही. त्याच वेळी, डीएसपी अंजली कृष्णा, तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांनी या घटनेवर कोणतेही विधान दिलेले नाही आणि फक्त असे म्हटले आहे की या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.