अखेर ‘त्या’ शिक्षकाकडून माफी, जाणून घ्या नेमकं काय घडलं होतं ?

नंदुरबार :  जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील खांडबारा येथील कृषी हायस्कूलमध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या कार्यक्रमावेळी झालेल्या वादग्रस्त घटनेने समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. कार्यक्रमादरम्यान शिक्षक प्रफुल्ल हरी वंजारी यांनी बूट घालून सावित्रीबाईंच्या प्रतिमेचे पूजन केल्याने या कृतीचा शिवसेना ठाकरे गटासह विविध संघटनांनी तीव्र विरोध केला होता.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत, शिक्षक प्रफुल्ल वंजारी यांनी सार्वजनिकरित्या माफी मागत सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास जलाभिषेक व दुग्धाभिषेक करून आपला खेद व्यक्त केला. त्यांनी पुतळ्यांचे पूजन करून यापुढे अशा प्रकारची चूक होणार नाही, अशी ग्वाही दिली.

या घटनेच्या निषेधार्थ शिवसेना ठाकरे गटाचे महानगरप्रमुख पंडित माळी यांनी पुढाकार घेत शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. त्यांच्या प्रयत्नांमुळे शिक्षकाने आपल्या कृतीसाठी माफी मागून समाजाची चूक सुधारण्याचा प्रयत्न केला.

या वेळी पंडित माळी यांच्यासह आनंद माळी, विजय माळी, निंबा माळी, बाबूलाल माळी, संभाजी माळी, वैशाली चौधरी, मनोज चौधरी, गणेश राठोड यांच्यासह शिवसेना कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रकरणामुळे समाजामध्ये सावित्रीबाई फुले यांच्या योगदानाबद्दल आदर व्यक्त करत त्यांचे कार्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार केला गेला.

सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीसारख्या पवित्र प्रसंगी कोणताही अपमान होऊ नये, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. या घटनेने सामाजिक एकता आणि सावित्रीबाईंच्या कार्याला उचित आदर देण्याचा संदेश दिला आहे.